कुख्यात गुंड महिलेच्या वाढदिवसाला भाजपचे आजी-माजी आमदार

0
91

मुंबई, दि. १७ ऑगस्ट (पीसीबी) – अपहरण, मारहाण, धमकावून जमीन बळकावणे, अवैध शस्त्र वापरणे, असे गंभीर स्वरुपाचे 30 हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात महिला गुंडाच्या बर्थडे सेलिब्रेशनला भाजपाचे आजी-माजी आमदार आणि स्थानिक नेत्यांनी हजेरी लावल्याचा प्रकार मीरा भाईंदर येथून समोर आला आहे. या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.राज्यातील महायुती सरकार गुंडांना पोसत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत असताना हा प्रकार उघड झाल्याने एकप्रकारे या आरोपावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच मीरा भाईंदर येथील नागरिक देखील याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 15 ऑगस्ट रोजी मीरा- भाईंदरमधील कुख्यात महिला गुंड गुलशन पटेल उर्फ ‘आपा’चा वाढदिवस होता. गुलशन पटेलसह तिच्या सहकार्‍यांनी बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन केले. यावेळी गुलशन पटेलला शुभेच्छा देण्यासाठी स्थानिक आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी हजर होते.

मीरा भाईंदर परिसरामध्ये गुलशन पटेलची मोठी दहशत आहे. अशा कुख्यात महिला गुंडाच्या वाढदिवसाला नेत्यांनी हजेरी लावल्याने मीरा भाईंदरमध्ये संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो आमदार गीता जैन यांनीच सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. त्यामुळे गुंडांना नेत्यांचा वरदहस्त असल्याचे स्थानिक नागरिक म्हणत आहेत.