कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलच्या कैदेतून पसार

0
1181

पुणे, दि. २१ (पीसीबी) : पुण्यातल्या येरवडा कारागृहातून पुन्हा एकदा एक कैदी पळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलच्या कैदेतून पसार झाला आहे. आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्ह्यामध्ये 2008 पासून येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. आज तो पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.

कैदी आशिष जाधवला येरवडा जेलमध्ये रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. काल दुपारच्या सुमारास जेलचे अधिकारी कैद्यांची मोजणी करताना त्यांना आशिष जाधव आढळून आला नाही. आणि त्यावरून तो जेलमधून पळून गेल्याचे निष्पन्न झाले. या घटनेमुळे येरवडा जेलमध्ये चाललं तरी काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

येरवडा कारागृहाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही जेलमधील कैद्यांकडे मोबाईल सापडलेले आहेत. जेलमधूनच ते बाहेरच्या गुंडांशी संपर्कात होते, ही बाबही आढळून आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कुख्यात गुंड असलेला कैदी जेलमधून पसार झाला आहे. यावर आता प्रशासन आणि पोलिस अधिकारी करतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .