दि.३१(पीसीबी)-नाशिक व त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७ साठीच्या सीसीटीव्ही प्रकल्पातील गंभीर अनियमितता, अवास्तव दर व सार्वजनिक निधीच्या गैरवापर असल्याची लेखी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. बाजारभावापेक्षा तब्बल २० पट जादा दराने खरेदी असल्याने या व्यवहाराची सखोल चौकशीची मागणी कुंभार यांनी केली आहे.
निवेदनात कुंभार म्हणतात, नाशिक व त्र्यंबकेश्वर कुंभ 2027 मध्ये वापरासाठी सीसीटीव्ही निगराणी प्रणाली व स्मार्ट तंत्रज्ञानाच्या प्रकल्पाची निविदा रक्कम बाजारभावांच्या तुलनेत अत्यंत जास्त आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च जवळपास रुपये ३०० कोटी असून, निविदेमधील दरांचा अभ्यास करता अनेक वस्तू व घटकांची किंमत बाजारातील चालू दरापेक्षा २ ते २० पट जास्त आहे.
मुख्य अनियमितता व निरीक्षणे :
1. अवास्तव दराने खरेदी:
• फिक्स्ड/IP बुलेट कॅमेऱ्यांची किंमत निविदेत ₹६५,००० प्रति युनिट दाखविण्यात आली आहे, तर त्याच दर्जाचे कॅमेरे बाजारात ₹३,००० ते ₹१२,५०० दरम्यान सहज उपलब्ध आहेत — म्हणजेच ५ ते २० पट अधिक किंमत.
• आयपी पीटीझेड (4 मेगापिक्सेल) कॅमेरे ₹१,३५,००० प्रति युनिट दाखविले असून बाजारभाव साधारण ₹२२,००० ते ₹६२,५०० पर्यंत आहेत — म्हणजे २ ते ६ पट वाढीव दर.
• नेटवर्किंग उपकरणे (PoE स्विचेस), इंस्टॉलेशन शुल्क आणि केबलिंग खर्च देखील अत्यंत जास्त ठेवले गेले आहेत.
• या दरवाढीमुळे शासनाच्या सार्वजनिक निधीचा गैरवापर झाला आहे.
2. २०१५ च्या तुलनेत प्रचंड वाढ:
२०१५ मध्ये नाशिक कुंभमेळा सीसीटीव्ही प्रकल्प फक्त ₹९.९४ कोटींमध्ये पूर्ण झाला होता, तर यावेळी तेच काम ₹२९४ कोटींना मॅट्रिक्स कंपनीला देण्यात आले आहे. खर्च जवळपास ३० पट वाढला असून यामागील कारणांमध्ये कोणतीही पारदर्शकता दिसत नाही.
3. अंदाजे प्रति-कॅमेरा एकूण खर्च ₹7.7 लाख इतका केला जाणार आहे . हा खर्च अतिप्रचंड आहे.
4. बाजारभाव आणि निविदा दर तुलना (सारांश):
घटक / वस्तू प्रमाण निविदा दर ₹ बाजारभाव (₹) निरीक्षण
Fixed/IP Bullet Camera (4MP) 3311 65,000 3,000 – 12,500 5–20 पट जास्त
IP PTZ Camera (4MP) 500 135,000 22,000 – 62,500 2–6 पट जास्त
Edge Level Access Switch (8 PoE Ports) 1300 70,000 2,300 – 10,000 अत्यंत जास्त
Installation & Commissioning 1120 28,000 सामान्य दरापेक्षा 3-5 पट जास्त दर
Last Mile Cabling & Civil Works 1120 110,000 वास्तविक खर्चापेक्षा खूप जास्त अपारदर्शक
वरील आकडेवारीनुसार कॅमेरे, नेटवर्क उपकरणे आणि इंस्टॉलेशनचे दर बाजारभावाच्या तुलनेत प्रचंड वाढवून दाखविण्यात आले आहेत. काही घटकांमध्ये दरवाढ २ ते २० पट इतकी आहे.
5. पूर्वीची चौकशी अपूर्ण:
२०१५ मध्ये तत्कालीन आपण मुख्यमंत्री या नात्याने या प्रकल्पातील अनियमिततेबाबत चौकशीचे आदेश दिले होते, परंतु त्या चौकशीचा अहवाल आजपर्यंत सार्वजनिक झालेला नाही. त्या वेळी कायमस्वरूपी बसवणे शक्य नसल्याने “तात्पुरते सीसीटीव्ही बसवले” असे आपण सांगितले होते, परंतु ११ वर्षांनंतरही कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसवलेले नाहीत. हे जाणीवपूर्वक केले आहे अशी शंका घ्यायला जागा आहे.
6. कुंभमेळ्याच्या ३० दिवसांसाठी हा सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे . म्हणजे प्रतिदिन १० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत .
वरील बाबींचा विचार करून. 
1. नाशिक व त्र्यंबकेश्वर कुंभ 2027 सीसीटीव्ही प्रकल्पाची स्वतंत्र व तांत्रिक लेखापरीक्षण चौकशी करण्यात यावी.
2. Matrix Smart Technologies Pvt. Ltd. व EY सल्लागार संस्था यांच्या भूमिकेची व लाभांची तपासणी करण्यात यावी.
3. प्रकल्पातील निविदा प्रक्रिया, दरनिश्चिती, व देयक तपशील सार्वजनिक करण्यात यावेत.
4. २०१५ साली आदेशित चौकशीचा अहवाल तात्काळ जाहीर करण्यात यावा.
5. अशा सर्व शासन प्रकल्पांसाठी बाजारभाव तुलना व दरनिश्चिती धोरण बंधनकारक करण्यात यावे.
राज्याच्या निधीचा वापर करून अशा प्रचंड दरवाढीच्या व अपारदर्शक प्रक्रियांमुळे लोकशाहीच्या मूलभूत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात झालेला खर्च, दरनिश्चिती व प्रक्रिया यांचे स्वतंत्र व न्यायालयीन परीक्षण करणे आवश्यक आहे. आपण हस्तक्षेप करून चौकशी करून सर्व संबधितांवर कारवाई करावी आणि सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी अशी विनंती कुंभार यांनी केली आहे.
 
             
		












































