किशोर आवरेंच्या हत्येच्या बदल्याचा कट पिंपरी- चिंचवड पोलिसांनी उधळून लावला; ४ पिस्तुल, १४ जिवंत काडतुसे जप्त

0
610

-दोघांना तळेगाव परिसरात अटक; नेमकं टार्गेट कोण होत याचा पोलिस तपास करत आहेत

तळेगाव दाभाडे, दि.२६ (पीसीबी) -जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हालचाल करणाऱ्या दोघांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली असून बदल्याचा कट उधळून लावला आहे. आरोपीकडून चार पिस्तूल आणि १४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. प्रमोद सांडभोर आणि शरद साळवी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव असून त्यांना एक जुलै पर्यंत न्यायलयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. शरद साळवी याच्यावर हत्या, बलात्कार असे गुन्हे दाखल असून सांडभोरवर हत्या, हत्येचा प्रयत्न अशी एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. या दोघांचं टार्गेट कोण होतं? याबाबत पिंपरी- चिंचवड पोलिस अधिक तपास करत आहेत. अद्याप ते कोणाला टार्गेट करणार होते हे पुढं येऊ शकलेलं नाही.

१२ मे रोजी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची धारदार शस्त्राने वार करून आणि गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गौरव खळदे याच्यासह सात जणांना अटक करण्यात आलेली आहे. तर, दुसरीकडे किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कट शिजवण्यात येत असल्याचं प्रकरण पुढे आले आहे. याप्रकरणी प्रमोद सांडभोर आणि शरद साळवी या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चार पिस्तूल आणि १४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पैकी सांडभोर हा तळेगाव येथे जमिनीचे काम करतो तर शरद साळवी हा दोन महिन्यापूर्वी हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेला आहे. नुकतेच नाशिकच्या कारागृहातून त्यांचा एक साथीदार सुटणार असल्याने ते त्याला भेटण्यास गेले होते. या हालचाली सुरू असताना रात्री त्यांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशाने हा सर्व खाटाटोप सुरू होता अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. परंतु, ते कोणाला टार्गेट करणार होते?, प्लॅन काय ? होता. याबाबतची सखोल चौकशी पोलिस करत आहेत. प्रमोद हा किशोर आवरेंच्या जवळ चा होता अशी माहिती देखील समोर येत आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमरीश देशमुख, पोलिस कर्मचारी सुमित देवकर, आशिष बनकर, गणेश सावंत, गणेश हिंगे, विनोद वीर, गणेश कोकणे आणि प्रवीण कांबळे यांच्या टीम ने केली आहे.