दि.१९(पीसीबी)-छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी येथे ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या गगनभेदी घोषात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात व भक्तीभावात साजरा करण्यात आला.
या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवकालीन परंपरा, लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या शिवप्रेमींमुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने दुमदुमून गेला.
उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात शिवनेरीच्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकत, या पवित्र भूमीतून समाजात ऐक्य, स्वाभिमान आणि संस्कारांची जपणूक करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी व हजारो शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने किल्ले शिवनेरी परिसरात उत्साह, अभिमान आणि ऐतिहासिक गौरवाचे वातावरण अनुभवास आले.




































