किल्ले शिवनेरी आणि लेण्याद्रीच्या डोंगरावर जाण्यासाठी रोपवे बांधण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद

0
357

पुणे, दि. ५ (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी आणि लेण्याद्रीच्या डोंगरावर जाण्यासाठी रोपवे बांधण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद सार्वजनिक बांधकाम, पुणे प्रादेशिक विभागाने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शिवभक्तांची रोपवेची मागणी पूर्ण होण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे.

जुन्नर हा पर्यटन तालुका घोषित करण्यात आला आहे. त्या या तालुक्यात पर्यटनाला चालना मिळावी. तसेच शिवनेरी गडावर येणारे शिवभक्त आणि लेण्याद्रि येथे येणारे गणेशभक्त तसेच बौद्ध लेण्यांना भेट देणारे अभ्यासक, पर्यटक यांच्या सोयीसाठी रोपवे बांधण्यासाठी खासदार झाल्यापासून डॉ. कोल्हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. या संदर्भात त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही या दोन्ही रोपवेसाठी निधीची मागणी केली होती.

खासदार डॉ. कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीयमंत्री गडकरी यांनी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय रोपवे कार्यक्रम पर्वतमाला’ योजनेंतर्गत प्रस्ताव सादर केल्यास निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार खासदार डॉ. कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण आणि सचिवांना पत्र पाठवून तातडीने प्रस्ताव मागवून घेण्याची मागणी केली होती. या मागणीवर तत्काळ कार्यवाही करीत शिवनेरी व लेण्याद्रि या दोन्ही रोपवेंचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम, पुणे प्रादेशिक विभाग यांना दिले होते.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम, पुणे प्रादेशिक विभाग यांनी १ जून रोजी उपसचिव (रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून असलेली शिवनेरी गडावर जाण्यासाठी आणि अष्टविनायक गणपती देवस्थान असलेल्या लेण्याद्रि डोंगरावर जाण्यासाठी रोपवे बांधण्याची मागणी पूर्ण होण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानेही तत्काळ कार्यवाही करीत शिवनेरी व लेण्याद्रि रोपवेचा प्रस्ताव सादर केला आहे. आता राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याची प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. आमदार अतुल बेनके आणि मी दोघेही या दोन्ही रोपवेसाठी आग्रही आहोत. त्यामुळे केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर होताच केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट घेऊन मंजुरी त्वरीत मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.