किराणा दुकान गोदामवर छापा, ६५ लाखाचा गुटखा जप्त

0
244

खेड-शिवापूर, दि. ३ (पीसीबी) : राजगड पोलिस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी पहाटे श्रीरामनगर (ता.हवेली) आणि शिंदेवाडी (ता.भोर) येथील गोडाऊनमध्ये टाकलेल्या छाप्यात सुमारे 65 लाख 19 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी रमेश मोतीलाल चौधरी (वय 37, रा. श्रीरामनगर, ता.हवेली) याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. श्रीरामनगर येथील एका दुकान व्यवसायिक बेकायदा गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार राजगड पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे श्रीरामनगर येथील किराणा दुकान व्यावसायिकाच्या गोडाऊनवर छापा टाकला. यावेळी तेथे विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या गुटखा, सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखू याचे बॉक्स आणि पोती आढळून आली.

यावेळी संबंधित दुकानदाराकडे सखोल चौकशी केली असता त्याचे शिंदेवाडी येथे गोडाऊन असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिंदेवाडी येथील गोडाऊनवर छापा टाकला असता त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा गुटखा आणि सुगंधी तंबाखूची पोती आढळून आली.