किरकोळ कारणावरून दोन गटात वाद

0
35

परस्पर विरोधात गुन्हे दाखल

दि.02 (पीसीबी) – किरकोळ कारणावरून मोशी येथे दोन गटात हाणामारी झाली. त्याबाबत परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना ३१ डिसेंबर रोजी रात्री घडली.

विकास ज्ञानेश्वर सस्ते (वय ४४, रा. मोशी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गोल्या उर्फ साहिल कांबळे, अजिंक्य काशीराम नलवाड (वय १९, रा. मोशी), चंद्रकांत नलवाड, रोहन हळकुंटे, केपी आणि इतर दोन ते तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास यांचा भाऊ विलास यांनी त्यांच्या बंगल्यासमोर थांबलेल्या तरुणांना ‘तुम्ही रस्त्यात का गोंधळ घालता’ असे विचारले. त्या कारणावरून आरोपींनी विलास यांना कोयत्याने, काठीने, विटांनी मारून गंभीर जखमी केले. फिर्यादी यांची आई भांडण सोडविण्यासाठी गेली असता त्यांनाही आरोपींनी मारहाण केली.

याच्या परस्पर विरोधात चंद्रकांत मनोहर नलवाड (वय ४६, रा. मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास उर्फ भाऊ ज्ञानेश्वर सस्ते, विकास ज्ञानेश्वर सस्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी यांच्या पुतण्या, त्यांच्या मित्राला आणि फिर्यादी यांना मारहाण केली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.