किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

0
1023

हिंजवडी, दि. २९ (पीसीबी) -विरुद्ध दिशेने गाडी चालवण्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. २७) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मधुबन हॉटेल चौक, हिंजवडी येथे घडली.

श्रीनाथ दिनकर जागडे (वय २९, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हेमराज शिंदे, कुणाल येवले आणि अन्य चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र आकाश हे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्यांचे आरोपींसोबत विरुद्ध दिशेने जाण्यावरून भांडण झाले. हेमराज याने हातातील कड्याने फिर्यादी यांच्या डोक्यात मारले. कुणाल येवले याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अन्य चार जणांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला लोखंडी रॉड, कोयता तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांनतर आरोपी गाडी घेऊन पळून गेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.