किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलांकडून तरुणाचा खून

0
207

पिंपरी, दि २२ जुलै (पीसीबी) भोसरी, – धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून अल्पवयीन सहा मुलांनी मिळून एका तरुणाचा खून केला. तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारून त्याला ठार मारण्यात आले. ही घटना शनिवारी (दि. 20) रात्री शांतीनगर, भोसरी येथे घडली.

किरण बाळू लेंढघर (वय 28, रा. शांतीनगर, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रक्रकरणी त्याचा भाऊ हर्षल बाळू लेंढघर (वय 32) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण हे त्यांचे दुकान बंद करून पायी चालत घराकडे जात होते. रस्त्याने जाताना त्यांचा एका अल्पवयीन मुलाला धक्का लागला. दारूच्या नशेत असलेल्या अल्पवयीन मुलाने किरण यांच्याशी वाद घातला. अल्पवयीन मुलाने त्याच्या पाच साथीदारांसोबत मिळून किरण यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

किरण रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.