पिंपरी, (दि. २५) – कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग येथे मोटार सायकल (दुचाकी) पास होईल असे बोलार्ड बसविल्यास कासारवाडीतील नागरिकांची प्रचंड मोठी गैरसोई होणार आहे. परिसरातील नागरिकांसाठी ते अन्यायकारक असल्याने त्याला विरोध असल्याचे लेखी पत्र स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमाताई सावळे आणि माजी नगरसेवक शाम लांडे यांनी भोसरी विभागाचे पोलीस वाहतूक निरीक्षक बी. आर. साळुंखे, यांना आज दिले. पत्रात आपला विरोध का आहे त्यामागचे सविस्तर कारण दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग व मुंबई पुणे हायवे अंडरपास येथे वाहतूककोंडी होत असल्याने, पिंपरी चिंचवड महानगरपालिका बी.आर.टी.एस. विभाग व भोसरी वाहतूक विभाग यांनी सदर रस्त्याची पाहणी केली. या ठिकाणी असलेली वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग येथे मोटार सायकल (दुचाकी) पास होईल, असे बोलार्ड बसविण्यात येणार आहे. अशा प्रकारचा पत्रव्यवहार भोसरी वाहतूक विभाग यांच्या मार्फत झाला असल्याचे समजले.
कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग येथे मोटार सायकल (दुचाकी) पास होईल असे बोलार्ड बसविण्यास आमचा विरोध असल्याचे सीमा सावळे आणि शाम लांडे यांनी स्पष्ट केले. ते म्हणतात, कासारवाडी मध्ये गणेशोत्सव काळात होणारे सार्वजनिक गणपती मंडळाचे विसर्जन असते. एक गाव एक शिवजयंती निमित्त होणारी मिरवणूक मोठी असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त होणारी मिरवणूक तसेच रामनवमी, हिंदू नववर्ष (गुडी पाडवा), बसवराज महाराज मिरवणूक, मुस्लीम धर्मीयांची ईद-ए-मिलादसाठी बोलार्ड हा सर्वात मोठा अडथळा असणार आहे. समस्त ग्रामस्थ कासारवाडी यांच्या वतीने भैरवनाथ यात्रा दरवर्षी आयोजित केली जाते. यात्रेचा पालखी सोहळा हा संपूर्ण कासारवाडी भ्रमण असते. कासारवाडी मधील वरील भागात होणारे अंत्यविधी तसेच आपत्कालीन काळात अग्निशामक, रुग्णवाहिका इ. हे सर्व कासारवाडीच्या पश्चिम भागातून पूर्व भागात व पूर्व भागातून पश्चिम भागात जात असतात. त्यामुळे कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग येथे मोटार सायकल (दुचाकी) पास होईल असे बोलार्ड बसविल्यास, सर्व धार्मिक कार्यक्रमांना बाधा होणार आहे तसेच कासारवाडीतील नागरिकांना गैरसोईचे व अन्यायकारक आहे. त्यामुळे सदर बोलार्ड बसविण्यास आमचा आणि समस्त कासारवाडी ग्रामस्थांचा विरिध आहे.
कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग येथे मोटार सायकल (दुचाकी) पास होईल असे बोलार्ड बसून सदरील भागात होत असलेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही. या ठिकाणी कासारवाडीचे प्रश्न लक्षात घेऊन योग्य व न्याय उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणा सीमा सावळे आणि शाम लांडे यांनी पत्रात केली आहे