दि . ११ ( पीसीबी ) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी (11 मे) शस्त्रसंधीबद्दल भारत आणि पाकिस्तानचं कौतुक केलं. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एका पोस्टमध्ये म्हटलं की, “मला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या मजबूत आणि दृढ नेतृत्वाचा खूप अभिमान आहे. त्यांनी योग्य वेळी शहाणपण आणि धैर्य दाखवत हा संघर्ष थांबवण्याचा निर्णय घेतला, कारण या संघर्षामुळे लाखो निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असता आणि मोठे नुकसान होऊ शकले असते.”
ट्रम्प पुढे म्हणाले,”मला अभिमान आहे की अमेरिका तुम्हाला या ऐतिहासिक निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकली.”
भारत आणि पाकिस्तानसोबत व्यापार वाढवण्याबद्दलही ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये उल्लेख केला.
यासोबतच ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानसोबत मिळून काश्मीर प्रश्नावर शांततापूर्ण तोडगा काढण्याबाबतही म्हटलं.
भारत-पाकिस्तान संघर्ष आणि 1971 मधील युद्धाच्या तुलनेवर शशी थरूर काय म्हणाले?
केरळमधील तिरुअनंतपुरमचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला.
ते म्हणाले, “मला वाटतं की 1971चं युद्ध आपल्या इतिहासातील एक मोठी कामगिरी होती आणि एक भारतीय म्हणून मला त्याचा अभिमान आहे. इंदिरा गांधींनी उपखंडाचा नकाशा बदलला होता. पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. आज पाकिस्तानची परिस्थिती वेगळी आहे. त्यांची लष्करी शस्त्रे, त्यांच्यामुळे होणारे नुकसान, सर्वकाही वेगळे आहे.”
‘…तोपर्यंत शाश्वत शांतता अशक्य’
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या शस्त्रसंधीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या एक्स अकाउंटवर त्यांनी लिहिले आहे, “जोपर्यंत पाकिस्तान आपल्या भूमीचा वापर भारताविरुद्ध दहशतवादासाठी करत राहील, तोपर्यंत शाश्वत शांतता शक्य नाही.”
“शस्त्रसंधी होवो किंवा न होवो, आपण पहलगाम हल्ल्यास जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांचा पाठलाग थांबवू नये. जेव्हा जेव्हा बाहेरून आक्रमण झाले आहे, तेव्हा मी सरकार आणि सशस्त्र दलांच्या पाठीशी उभा राहिलो आहे. हे समर्थन कायम राहील,” असं ओवैसी म्हणाले.