वाकड, दि.१३ (पीसीबी)
पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेलमध्ये बसलेल्या दोघांनी पिस्तुलातून टेबलवर गोळीबार केला. ही घटना गुरुवारी (दि. 12) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एका माजी नगरसेवकासह दोघांना अटक करण्यात आली आहे.
सचिन दत्तू नढे, विनोद जयवंत नढे अशी अटक केलेल्या माजी नगरसेवकांची नावे आहेत. तुषार लक्ष्मीचंद भोजवानी (वय 24, रा. पाचपिर चौक, पंचनाथ कॉलनी, काळेवाडी) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन दत्तू नढे, विनोद जयवंत नढे, तुकाराम नढे, माऊली नढे हे काळेवाडी पेट्रोल पंप समोर राहुल बार अँड खुशबू हॉटेल मध्ये गुरुवारी रात्री पहिल्या मजल्यावर बसले होते. हॉटेलचे मॅनेजर तुषार भोजवानी यांना रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास फटाक्यासारखा मोठा आवाज आला. त्यांनी वरती जाऊन पाहिले असता सचिन नढे याच्या हातामध्ये लोखंडी रिव्हॉल्वर होते. त्याने लोखंडी रिव्हॉल्वरने जेवणाच्या प्लेट ठेवण्याच्या पत्र्याच्या सर्विस टेबलवर फायर केला. त्यामुळे त्याच्या रिव्हॉल्वर मधून सुटलेली गोळी टेबल मधून आरपार जाऊन टेबलला छिद्र पडले. तेथे बुलेटची एक पुंगळी बाजूला पडली होती.
गोळीबार झाल्यानंतर हॉटेल मधील ग्राहक घाबरून पळून गेले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विनोद नढे हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.










































