काळाखडक पुनर्वसन प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

0
179

थेरगाव, दि. 04 (पीसीबी) : काळाखडक येथील नागरिकांच्या वतीने काळाखडक मधील मूळ नागरिकांना न्याय मिळावा तसेच काळाखडक पुनर्वसन प्रकल्पातील गैरव्यवहार व भ्रष्टचार विरोधात मागील अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरु आहे . काळाखडक येथील रहिवाश्यांच्या वतीने अपना वतन संघटनेने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण सोबत सातत्याने पाठपुरावा केलेला आहे . तसेच वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून प्रकल्पातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली होती .
दि . २२/१०/२०२४ रोजी अपना वतन संघटनेने मा. विभागीय आयुक्त , पुणे यांना लेखी तक्रारी द्वारे झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालय येथे उप जिल्हाधिकारी श्री . दत्तात्रय कवितके , तहसीलदार सौ . लैला शेख , नायब तहसीलदार श्री . सूर्यकांत पठाडे , सर्व्हेक्षक प्रवीण घुलगे या एसआरए अधिकाऱ्यांनी विकसकाशी संगनमत करून , सर्व्हे न १२४/१ काळाखडक , वाकड येथील प्राथमिक पात्रता यादी, आर्थिक लाभ मिळवण्याच्या उद्देशाने बनावट खरेदीखत बनवून , खोट्या कागदपत्राद्वारे सदोष , चुकीची व बोगस यादी तयार केल्याप्रकरणी चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी विभागीय आयुक्त , पुणे यांचेकडे तक्रार केली होती.

त्यानुसार तक्रार निवारण समिती , विधानभवन यांनी सदर प्रकल्पाची चौकशी होईस्तर स्थगिती देणेबाबत चे पत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्याधिकारी निलेश गटणे याना पाठवले आहे . याबाबत काळाखडक येथील स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून प्रकल्पाच्या नावावर होणार करोडो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणल्याबद्दल अपना वतन संघटनेचे आभार व्यक्त केले . यावेळी बोलताना सिद्दीकभाई शेख म्हणाले कि, काळाखडक झोपड्पट्टीमधील प्रत्येक नागरिकाला हक्कच घर भेटलं पाहिजे . झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात नागरिकांची होणारी फसवणूक थांबली पाहिजे . तसेच विकसक व एसआरए अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार बंद झाला पाहिजे अशी आमची भूमिका होती परंतु पैशाच्या व गुंडगिरीच्या जोरावर विकसक प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करीत होता . स्थानिक नागरिकांच्या सर्व अटी व शर्थीचे पालन करण्यात विकसक अपयशी ठरलेला आहे . त्यामुळॆ स्थानिक नागरिकांचा या प्रकल्पाला प्रचंड विरोध होता . अशा परिस्थिती नागरिकांच्या हक्कांसाठी कोणीही नेते पुढाकार घेत नसल्याने त्यांनी अपना वतन संघटनेला विनवणी केली आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना अनेक अडचणी येऊनसुद्धा सातत्याने लढत आहे.