कार विक्रीच्या बहाण्याने नऊ लाखांची फसवणूक

0
90
187143521

पिंपरी, दि.10 (पीसीबी) चिंचवड,
विक्रीस नसलेली कार आपल्याकडे विक्रीस असल्याचे भासवून त्याबाबत व्यवहार ठरवून नऊ लाख रुपये घेतले. त्यानंतर 20 दिवसांनी कागदपत्रे देतो, असे सांगितले. मात्र ती कार विक्रीसाठी नसल्याचे कारच्या मूळ मालकाने सांगितले. हा प्रकार 16 जानेवारी ते 2 मार्च या कालावधीत वाल्हेकरवाडी चिंचवड आणि काळेवाडी फाटा येथे घडला.

डायमंड मोटर्स काळेवाडी फाटा येथील व्यवस्थापक अजित कुलाल, काकडे, नितेश पवार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विनोदकुमार बाळू गावडे (वय 45, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजित कुलाल याने एमएच 12/व्हीटी 1944 ही कार विक्रीसाठी असल्याचे गावडे यांना सांगितले. गावडे यांचा विश्वास संपादन करून कारच्या मोबदल्यात नऊ लाख रुपये घेतले. कारचे कागदपत्रे 20 दिवसांनी देतो, असे आरोपीने सांगितले. दरम्यान, गावडे यांनी कारच्या मूळ मालकाला भेटून कागदपत्रांबाबत विचारणा केली. त्यावेळी ती कार विक्रीसाठी नसल्याचे समजले. यानंतरही अजित कुलाल याने कागदपत्र देतो, असेच सांगितले. दरम्यान, गावडे यांनी वाल्हेकरवाडी येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली कार आरोपी नितेश पवार याच्या मार्फत दुसऱ्या चावीचा वापर करून घेऊन जात फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.