कार खरेदी मध्ये अडीच लाखांची फसवणूक

0
27

हिंजवडी, दि. १५ (पीसीबी)
कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने एका व्यक्तीची कार खरेदी केली. त्याला ठरलेली रक्कम न देता त्याची दोन लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना २६ जून ते २८ ऑगस्ट या कालावधीत छत्रपती मोटर्स, विनोदे वस्ती, हिंजवडी येथे घडली.

राजेंद्र भागवत फाळके (वय ३४, रा. नरेगाव, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंबादास किसान काकडे (रा. हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फाळके यांची कार (एमएच १२/क्यूडब्ल्यू ३४१९) आरोपी काकडे याने साडेतीन लाख रुपयांना खरेदी केली. त्यानंतर फाळके यांनी त्यांची कार आणि त्यासंबंधित सर्व कागदपत्रे काकडे याला दिली. काकडे याने फाळके यांना तीन लाख रुपयांचा चेक दिला. तो चेक फाळके यांनी बँकेत जमा केला असता काकडे याच्या खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने तो क्लिअर झाला नाही. याबाबत फाळके यांनी काकडे याला सांगितले असता काकडे याने फाळके यांना ९० हजार रुपये दिले. त्यानंतर उर्वरित दोन लाख ६० हजार रुपये न देता त्यांची फसवणूक केली. काकडे याने आणखी काही लोकांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.