कार्यतत्पर अधिकारी म्हणून उपायुक्त विठ्ठल जोशी यांची ओळख….

0
5

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे गौरवाद्गार, प्रतिनियुक्तीवर आलेले जोशी यांची महसूल व वन विभागात बदली*

*पिंपरी, दि . १४ * पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला आवश्यक असणारे सर्व कामकाज विहित वेळेत पार पाडणारे कार्यतत्पर अधिकारी म्हणून उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी काम केले. इतरांसाठी आदर्श ठरणारे अधिकारी म्हणून विठ्ठल जोशी यांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल, असे गौरवाद्गार आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी काढले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले आणि महानगरपालिकेतील तीन वर्षांचा कालखंड पूर्ण करून त्यांच्या मूळ महसूल व वन विभागात बदली झालेले उपजिल्हाधिकारी विठ्ठल जोशी यांचा निरोप समारंभ महानगरपालिकेतील दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात संपन्न झाला. यावेळी आयुक्त सिंह बोलत होते. याप्रसंगी आयुक्त सिंह यांच्या हस्ते विठ्ठल जोशी यांचा भक्ती-शक्ती समुह शिल्प, मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, मुख्य वित्त लेखा अधिकारी प्रवीण जैन, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, नगर विकास विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांच्यासह सह शहर अभियंता, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, क्षेत्रिय अधिकारी, मुख्य सुरक्षा अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आदी उपस्थित होते.

महानगरपालिकेत विठ्ठल जोशी यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी होती. ही जबाबदारी त्यांनी व्यवस्थित पार पाडली. याशिवाय आयुक्त म्हणून मी त्यांच्याकडे सोपावलेले सर्व प्रशासकीय काम त्यांनी विहित वेळेत पूर्ण केले असून त्यांचे काम कौतुकास पात्र आहे. प्रशासकीय सेवेचा उत्तम परिपाठ त्यांनी आपल्या कार्य कर्तृत्वातून दाखवून दिला आहे. पीसीएमसी@५० तसेच १०० दिवस कृती आराखडा, राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अशा विविध उपक्रमांतर्गत त्यांच्यावर टाकण्यात आलेली जबाबदारी त्यांनी अतिशय चोखपणे पार पाडली. अशा अधिकाऱ्यांमुळे प्रशासन गतिमान होण्यास मदत होते, असा आवर्जुन उल्लेख करीत आयुक्त सिंह यांनी विठ्ठल जोशी यांना पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय असाच आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली येथे काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी दाखवलेला विश्वास, आदरयुक्त वागणूक, कमालीची संवेदनशीलता, सुशील सुहृदयता कायमची मनावर कोरलेली राहील. महापालिकेत काम करताना सर्व अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, शहर अभियंता, सर्व विभागप्रमुख, माझ्याशी खास स्नेह ठेवणारे डॉक्टर्स, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष, प्रशासन विभागातील सर्व सहकारी आभार मानतो.

  • विठ्ठल जोशी, माजी उपायुक्त