कार्यकाळ पूर्ण करणारे विनय कुमार चौबे पहिले पोलिस आयुक्त

0
53

पिंपरी, दि. १५ – वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पिंपरी- चिंचवडमध्ये स्वतंत्र पोलिस आयुक्तालय कार्यान्वीत करण्यात आले. १५ ऑगस्ट २०१८ मध्ये सुरु झालेल्या आयुक्तलयाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या सहा वर्षाच्या कालावधीत शहरात आलेल्या चार पोलिस आयुक्तांची कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच उचलबांगडी करण्यात आली. दरम्यानच्या काळात राज्यात झालेली सत्तांतरे यासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जात होते. पाचव्या क्रमांकावर शहरात आलेले विनय कुमार चौबे यांनी मात्र वेगळा इतिहास रचला. १४ डिसेंबर २०२२ रोजी पदभार हाती घेतलेल्या चौबे यांनी आपला कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

आर. के. पद्मनाभन पहिले आयुक्त
भाजपा सरकारच्या काळात १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु करण्यात आले. अपर पोलीस महासंचालक दर्जाचे आर. के. पद्मनाभन यांना पहिले आयुक्त म्हणून मान मिळाला. त्यांनी अपुऱ्या मनुष्यबळावर कारभार पाहिला. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांनी शहरातील राजकीय प्रस्थ असलेल्या व्यक्तींशी पंगा घेतला. त्यामुळे निवृत्तीला अवघे काही दिवस शिल्लक असताना निवडणुकीच्या तोंडावर त्यांची उचलबांगडी करण्यात आली.

आर. के. पद्मनाभन यांना साईड ट्रॅक केल्यानंतर भाजपा सरकारच्या काळातच त्यांच्या जागी भारतीय पोलीस सेवेतील अपर पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी संदीप बिष्णोई यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, शहरात अवैध धंदे फोफावल्याची ओरड झाली. शहराबाहेरील एक पठाण नामक व्यक्ती धंद्यांची वसुली करीत असल्याचे आरोप करण्यात आले. शहरातील एका लोकप्रतिनिधीने याचे भांडवल केले. त्यामुळे बिष्णोई यांची देखील वेळेआधी उचलबांगडी झाल्याचे बोलले जात आहे. याविरोधात संदीप बिष्णोई कॅटमध्ये धाव घेणार होते. मात्र, काही दिवसातच त्यांनी तलवार म्यान केली.

आघाडी सरकारच्या काळात कृष्ण प्रकाश यांची वर्णी
राजकारणातील ‘दादा’ अशी ओळख असलेल्या नेत्यांच्या जवळचे मानले जाणारे कृष्ण प्रकाश यांची संदीप बिष्णोई यांच्या रिक्तजागी ‘वर्णी’ लावण्यात आली. त्यांच्यासाठी अपर पोलीस महासंचालक दर्जा असलेल्या पिंपरी- चिंचवड आयुक्तलयाचे पदावतन करण्यात आले. दरम्यानच्या काळात त्यांनी एका मोठ्या पक्षाच्या नेत्यांच्या नाड्या आवळून अक्षरशः पळताभुई थोडी केली. त्यामुळे त्यांनीही एकजूट होऊन कृष्ण प्रकाश यांच्यावर वेगवेगळे आरोप केले. दादांच्या जवळचे समजल्या जाणाऱ्या लोकप्रतिनिधींना देखील त्यांनी सोडले नाही. त्यामुळे दादांनीही ऐनवेळी डोक्यावरील हात बाजूला केला. परिणामी मोठ्या साहेबांच्या नावाखाली त्यांचीही उचलबांगडी करण्यात आली.

कृष्ण प्रकाश यांच्या जागी राष्ट्रवादी पक्षातील मोठ्या साहेबांचे खास अशी ओळख आसलेले अंकुश शिंदे यांची आयुक्तपदी वर्णी लावण्यात आली. दरम्यान, कार्यकाळ पूर्ण न झाल्याने कृष्ण प्रकाश यांनी दादांकडे दाद मागितली. मात्र, त्यांनी साहेबांचे नाव घेत त्यांनी जबाबदारी झटकली. त्यामुळे कृष्ण प्रकाश यांनी थेट बारामती गाठले. मात्र, तेथे देखील त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही महिन्यात आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर अंकुश शिंदे यांची बदली होणार याच्या चर्चा सुरु असतानाच गृहविभागाने पुन्हा पद उन्नत करून अपर पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी विनय कुमार चौबे यांची नियुक्ती केली.

विनय कुमार चौबे यांचा कार्यकाळ पूर्ण
विनय कुमार चौबे यांना सन २०२० मध्ये अपर पोलीस महासंचालक पदी बढती मिळाली आहे. मुंबई शहरात त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्हणून देखील ते काम पाहत होते. चौबे हे सन १९९५ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी कानपुर येथून शिक्षण पूर्ण केले आहे. मागील काळात राज्यातील विरोधी पक्ष शिंदे सरकार कोसळणार असल्याचे भाकीत वर्तवत होते. त्यामुळे विनय कुमार चौबे तरी आपला कार्यकाळ पूर्ण करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शेवटी शनिवारी (दि. १४) त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे.

पोलीस आयुक्त शहरातील कार्यकाळ
आर के पद्मनाभन १३ महिने ५ दिवस
संदीप बिष्णोई १४ महिने १४ दिवस
कृष्ण प्रकाश १८ महिने १६ दिवस
अंकुश शिंदे ७ महिने २३ दिवस
विनय कुमार चौबे २ वर्ष (आज पर्यँत)