कार्तिकी यात्रेला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुजा होऊ देणार नाही

0
231

पंढरपूर, दि. ८ (पीसीबी) – पंढरपूरमध्ये होणाऱ्या विठ्ठलाच्या कार्तिकी एकादशीची शासकीय महापुजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी बोलावण्यात आलेली बैठकही या आंदोलकांनी उधळून लावण्याचा प्रयत्न केला.तसेच मंदिर समितीनं देखील याबाबत सरकारपर्यंत मराठा समाजाची मागणी कळवू, असं सांगत सावध पवित्रा घेतला आहे.

कार्तिकी एकादशीची शासकीय महापुजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला. तसेच त्यांनी म्हटलं की, सकल मराठा समाजानं आगोदरच इशारा दिला आहे की, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही उपमुख्यमंत्र्याला इथं येऊ देणार नाही. तसं आम्ही मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे.

पण तरीही तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना बोलावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासू तसेच निमंत्रण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांच्या तोंडालाही आम्ही काळं फासू. जर यांनी पोलीस प्रशासनाच्या बळाचा वापर केलातर सन २०१८ सारखं मोठं आंदोलन पंढरपुरात होईल, त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासनं असेल, असा इशारही यांनी दिला.