ऑनलाईन माध्यमातून जबरदस्तीने घेतले पैसे
भोसरी, दि. 04 (पीसीबी) : कारला धक्का लागल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून मारहाण करत दोघांचे आळंदी रोड भोसरी येथून अपहरण केले. दोघांकडून जबरदस्तीने ऑनलाईन माध्यमातून पैसे घेत त्यांना चाकण परिसरात सोडून दिले. ही घटना सोमवारी (दि. 2) सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
विनोद दिलीप सोनवणे (वय 35, रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह नितीन गराडे आणि त्याचा मित्र सोन्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विशाल शाहुराज दुधभाते (वय 25, रा. हडपसर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल यांच्या गाडीचा आरोपींच्या गाडीला धक्का लागला. त्या कारणावरून आरोपींनी विशाल आणि त्यांचे नातेवाईक शिवाजी लक्ष्मण काळे यांना ‘आम्हाला नुकसान भरपाईचे पैसे दे. नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिली. विशाल आणि शिवाजी यांचे मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतले. शिवीगाळ करत लाथाबक्यांनी मारहाण केली. त्यानंतर दोघांना जबरदस्तीने कार मध्ये बसवून त्यांचे अपहरण केले. दोघांना मोशी चाकण परिसरामध्ये नेऊन त्यांच्या खिशातून तीनशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच मोबाईल मधील फोन पे द्वारे दहा हजार रुपये आरोपींनी त्यांच्या मोबाईल मधील स्कॅनरवर स्कॅन करून जबरदस्तीने पाठविण्यास सांगितले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.