कायदेशीर बाबी उद्‌भवल्यास विभागप्रमुख जबाबदार; आयुक्तांचा इशारा

0
262

पिंपरी, दि. ०७ (पीसीबी) – पाणी पुरवठा विभागासंदर्भातील एका निविदेमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे समोर आले होते. या निविदेमध्ये मुख्य लेखा परीक्षक यांनी सुमारे 25 आक्षेप काढले होते. लेखा परीक्षकाने या निविदेसंदर्भात कायदेशीर बाबी उद्‌भवल्यास पाणी पुरवठा विभाग प्रमुखच जबाबदार असल्याचे सांगून टाकले होते. त्यामुळे विषयपत्र सादर करण्यापूर्वी महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि मुख्य लेखा परीक्षक यांचे अभिप्राय घेऊन सादर करावेत. त्यांचे अभिप्राय न घेता काही त्रुटी अथवा कायदेशीर बाबी उद्‌भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी विभागप्रमुखावर राहील, असा इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व विभागप्रमुखांना दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर विकासाच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने विविध विकास कामे, प्रकल्प राबविण्यात येतात. यासाठी संबंधित विभागाकडून प्रस्ताव अथवा विषय स्थायी समिती आणि महापालिका सभेच्या मान्यतेसाठी आयुक्तांकडे सादर केले जातात. विषयपत्र विशेषतः विकासकामे, वस्तु व सेवा खरेदी व आर्थिक बाबींशी निगडित असतात. वास्तविक असे विषयपत्र सादर करताना ते मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे व मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले यांचे अभिप्राय न घेता आयुक्तांकडे सादर केले जात असल्याची बाब त्यांच्या निदर्शास आली आहे.

त्यामुळे निविदा विषयक सर्व प्रकारचे विषयपत्र हे मुख्य लेखा परीक्षक यांचे अभिप्राय घेऊन आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्यामार्फत सक्षम मान्यतेकामी सादर करावेत. तसेच आर्थिक बाबीशी निगडित निविदा कामकाजास मुदतवाढ, अंदाजपत्रकातील तरतूद वर्गीकरण व एखादया निर्णयामुळे होणारे आर्थिक दायित्व अशा प्रकारचे प्रस्ताव मुख्य लेखा व वित्त अधिकारी कोळंबे यांचे अभिप्राय घेऊन मान्यतेकामी सादर करावेत, असा आदेश आयुक्त सिंह यांनी दिला आहे.