काम करताना आपण नेहमी आपली प्रतिष्ठा जपायला हवी

0
110

जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा नवोदित कलाकारांना कानमंत्र

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वर्धापन दिन सोहळ्यात हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

पिंपरी, दि. १० ऑगस्ट (पीसीबी) -इतर माध्यमे आल्याने नाटक आणि चित्रपट माध्यमात बदल झाले आहेत. त्यामुळे सतत शिकत राहिले पाहिजे. या क्षेत्रात काम करताना आपण नेहमी आपली प्रतिष्ठा जपायला हवी, असही कानमंत्र जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आज चिंचवड येथे बोलताना दिला.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी- चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेते अजित भुरे यांच्या हस्ते हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पन्नास हजार रोख, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर उपस्थित होते. याबरोबरच कलावंत मधु जोशी, निवेदक श्रीकांत चौगुले, अभिनेता पंकज चव्हाण, अभिनेत्री कोमल शिरभाते, लावणी नृत्यांगना आशारुपा परभणीकर व नाट्यकर्मी नटराज जगताप यांना पुरस्कार देण्यात आला.या पुरस्कार सोहळ्यानंतर अजित भुरे यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापासून तर कला क्षेत्रातील वाटचाल, चित्रपट, नाट्य माध्यमात झालेला बदल यावर त्यांनी मनमोकळी मत व्यक्त करत आपला जीवनपट उलगडला.

हट्टंगडी म्हणाल्या की, कोणत्याही भूमिकेशी समरस होऊन काम करायला हवे. आपली प्रतिष्ठा आपणच जपायला हवी. क्षेत्र कोणतेही असो, मेहनतीला पर्याय नाही. आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवायचे आहे. त्याचा सातत्याने अभ्यास करणे, शिकत राहणे महत्त्वाचे आहे. आपले क्षितिज गाठण्यासाठी आपण नेहमी अभ्यासूवृत्ती, झोकुन देऊन काम करायला हवे. काहीही झाले तरी मेहनतीला पर्याय नाही. मी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून कलाक्षेत्रात कार्यरत आहे.