दि.०१(पीसीबी)- केंद्र सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी व जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ १ एप्रिल रोजी पिंपरी-चिंचवड शहरात ‘काळा दिवस’ आंदोलन उत्साहात व मोठ्या प्रतिसादात पार पडले. पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात आयोजित या आंदोलनात बहुसंख्य कामगार, कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते. इंटक व हिंद कामगार संघटना (इंटक संलग्न) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
आंदोलनादरम्यान सहभागी कामगारांनी काळे झेंडे व बॅज लावून घोषणाबाजी केली आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध नोंदविला. चार श्रमसंहितांमुळे कामगारांचे मूलभूत हक्क धोक्यात येत असून, ठेका पद्धतीला चालना मिळत असल्याची तीव्र टीका करण्यात आली.
या प्रसंगी इंटकचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कामगारांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी संघटित संघर्ष आवश्यक आहे. सरकारने कामगारविरोधी धोरणे तात्काळ मागे घ्यावीत; अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सदर आंदोलन पूर्णपणे शांततेत, शिस्तबद्ध व संविधानिक मार्गाने पार पडले. शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन कामगारांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी अपेक्षा इंटक प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी व्यक्त केली आहे.
केंद्र शासनाने कोणतीही पूर्व चर्चा न करता लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांच्या निषेधार्थ तसेच कामगारविरोधी धोरणे व कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात विविध कामगार संघटना, कर्मचारी संघटना, आशा, अंगणवाडी, एमडीएम कर्मचारी, एनएचएम कर्मचारी तसेच इतर क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले.








































