“कामगारांमधून उद्योजक निर्माण व्हावेत!” – पुरुषोत्तम सदाफुले

0
164

पिंपरी,दि. १० (पीसीबी) – “घट्टे पडलेले हात पवित्र असतात. असे हात असलेल्या कामगारांमधून उद्योजक निर्माण व्हावेत!” अशी अपेक्षा महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी ऑटो क्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, जुना मुंबई – पुणे हमरस्ता, चिंचवड येथे शुक्रवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी व्यक्त केली. इंडस्ट्री सपोर्ट ऑर्गनायझेशन, पुणे आयोजित ‘शासनाच्या विविध योजना आता लघु व मध्यम उद्योजकाच्या दारी’ या विनाशुल्क विशेष कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत मांडताना पुरुषोत्तम सदाफुले बोलत होते. मुंबई येथील नॅशनल ॲप्रेंटिस बोर्ड उपसंचालक एन. एन. वडोदे, पुणे येथील कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहाय्यक आयुक्त सचिन जाधव, अधिकारी अतुल मुळे,पुणे जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्योग निरीक्षक शैला वानखेडे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ – संभाजीनगर केंद्रप्रमुख संदीप गावडे, तुकारामनगर केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे, इंडस्ट्री सपोर्ट ऑर्गनायझेशनचे संचालक नंदकिशोर जगदाळे आणि सूर्यकांत मुळे आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

पुरुषोत्तम सदाफुले पुढे म्हणाले की, “लघु उद्योजकांपर्यंत विविध शासकीय योजना पोहोचाव्यात या स्तुत्य हेतूने चालविलेले हे अभियान अतिशय स्तुत्य आहे. सर्व काही शासनाने करावे अशा मानसिकतेच्या पार्श्वभूमीवर श्रमिकांमधून उद्योजक निर्माण होणे ही काळाची गरज आहे!” सूर्यकांत मुळे यांनी प्रास्ताविकातून, “शिकाऊ उमेदवार, नोकरी प्रोत्साहन, कामगार कल्याण, कामावर विमा, कामगार भविष्य, उद्योग विकास आणि विश्वास अशा विविध पैलूंवर मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देऊन इंडस्ट्री सपोर्ट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे दहा हजार उमेदवारांना प्रशिक्षित करण्यात आले आहे!” अशी माहिती दिली.

एन. एन. वडोदे यांनी, “नॅशनल ॲप्रेंटिस बोर्ड ही शासकीय संस्था असलीतरी संस्थेने खाजगी लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रांत आपल्या कार्यक्षमतेमुळे उत्तम नावलौकिक मिळविला आहे!” असे सांगून ॲप्रेंटिस ॲक्ट १९६१ अन्वये विविध आस्थापनांमध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांचे तपशील मांडून प्रतिवर्षी सुमारे १,७८,००० उमेदवारांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रति उमेदवार ₹५४,०००/- (अभियांत्रिकी पदवीधर) आणि ₹४८,०००/- (पदविका धारक) विद्यावेतन देत आहे, अशी माहिती दिली. अतुल मुळे यांनी शासनाच्या जिल्हा कौशल्य विभागाच्या वतीने रोजगार प्रोत्साहन योजना, ऑनलाईन आणि ऑफलाईन रोजगार मेळावे, रोजगार महास्वयंम वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या रोजगार संधी, बेरोजगारांना देण्यात येणारा रोजगार भत्ता याविषयी ऊहापोह केला. संदीप गावडे यांनी पाचपेक्षा जास्त कामगार असलेल्या कोणत्याही आस्थापनांना कामगार कल्याण मंडळाशी संलग्न होण्याचे कायदेशीर बंधन आहे असे सांगितले. महाराष्ट्र लेबर वेल्फेअर बोर्ड कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक साहाय्य, एम एस सी आय टी शुल्कात सवलत, परदेशी उच्च शिक्षणासाठी मदत, गंभीर आजार अर्थसाहाय्य, कामगारांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन, राज्य नाट्य स्पर्धा, कामगार साहित्य संमेलन, गुणवंत कामगार पुरस्कार अशा विविध योजना राबविते; याशिवाय आस्थापनांना कामगारमित्र पुरस्कार प्रदान करते, अशी माहिती दिली. नंदकिशोर जगदाळे यांनी नीती आयोगाचे कार्य आणि विविध योजना लघु उद्योजकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. शैला वानखेडे यांनी जिल्हा उद्योग केंद्राची मुख्यमंत्री रोजगार योजना ही पंतप्रधान रोजगार योजनेप्रमाणे कार्यान्वित आहे, असे सांगितले. प्रमोद जुमले यांनी आत्मविश्वासाचे वरदान लाभलेल्या व्यक्तींच उद्योजक होऊ शकतात, असे प्रतिपादन केले.

मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी गुणवंत कामगार सुरेश कंक यांनी,
“तुकोबाच्या सोयऱ्यात
विठू सावळा पहावा
रामकृष्ण म्हणोनिया
एक वृक्ष तो लावावा!”
या कवितेचे गायन केले. कार्यक्रमाच्या दरम्यान गुणवंत कामगार अण्णा जोगदंड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. इंडस्ट्री सपोर्ट ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कंक यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.