कामगारांच्या हितासाठी महाविकास आघाडीला विजयी करा: संजोग वाघेरे

0
193
  • संजोग वाघेरे पाटलांनी घेतली टाटा मोटर्स कामगारांची भेट !

पिंपरी – महाराष्ट्रातील लहान, मोठे उद्योगधंदे स्थलांतरीत होत आहेत. विविध कंपन्या बंद पडत आहेत. तरुणांना रोजगार हिरावून घेतला जात आहे. तर कमगारविरोधी कायदे करणा-या सरकारला खाली खेचण्यासाठी आणि कामगारांच्या हितासाठी महाविकास आघाडीला विजयी करा, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी केले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ चिंचवड येथील टाटा मोटर्स कामगारांची भेट घेतली. या वेळी त्यांच्यासोबत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) राज्य संघटक एकनाथ पवार, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबर, उपजिल्हा प्रमुख रोमी संधू, माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, राम दातीर पाटील, अमोल भोईटे यांच्यासह घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामगारांशी संवाद साधताना संजोग वाघेरे पाटील म्हणाले, तरुणांना रोजगार देण्याच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला खाली खेचायचे आहे. कंपन्या गेल्यामुळे हजारो-लाखो तरुणांच्या हातचे काम निघून गेले असून बेरोजगारीच्या विळख्यात आजचा सुशिक्षित तरुणवर्ग सापडला आहे. अशिक्षित, अकुशल कामगारांचे, तर हालच होत आहेत. पुण्यासारख्या शहरात रोजगाराची मोठी संधी आहे. सरकारने तळेगाव एमआयडीसी, आयटी पार्कमधील किती कंपन्यांनी स्थलांतर केले आहे. किती कंपन्या बंद पडल्या आहेत, याचाही खुलासा करावा. आजचा तरुण हुशार आहे, कोण खरं बोलतो आणि कोण थापा मारतो आणि कोण फसवी गॅरंटी देतो. हे त्यांना बरोबर कळते. म्हणूनच देशाचे आधारस्तंभ असलेल्या युवावर्गाची नोकऱ्यांसंदर्भातली होणारी क्रूरथट्टा थांबवावी लागेल. यासाठी महाविकास आघाडीला निवडून द्या. मावळ लोकसभा निवडणुकीत मशाल या चिन्हाची निवड करून विजयी करा, असे आवाहन त्यांनी कामगारांना केले.

यावेळी एकनाथ पवार, मारुती भापकर यांनी देखील उपस्थित कामगारांना केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविषयी अवगत गेले. ही लोकसभा निवडणुकीत शेतकरी व कामगारांच्या दृष्टीने अतिशम महत्त्वाची निर्णायक आहे. त्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना निवडून कामगारांचा प्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.