कागदोपत्री बांधकाम दाखवून २५ कोटींचे कर्ज लाटले, स्टेट बँक मॅनेजरवर गुन्हा

0
701

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – हिंडवडी येथील ७१ गुंठे मोकळ्या जागेवर बांधकाम प्रकल्प उभारण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) या बॅंकेकडे कर्जाची मागणी केली होती. कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी पिंपरी शाखेच्या बॅंके मॅनेजरकडे कागदपत्रे जमा करण्यात आली. या कागदपत्रांचा खोटा वापर करुन या जागेवर बांधकाम झालेले नसतानाही बांधकाम झाल्याचे कागदोपत्री दाखवून आणि खोट्या सह्या करुन परस्पर २५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन मॅनेजरनेच पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी गौरव सोमानी (वय३४, शोभा सवेर, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय रायकर, महेश भगवानराव नलावडे, मंदाकिनी महेश नलावडे, शहाबाज जाफर यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०२० ते २०२४ या दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमानी यांची साई प्लॅटेनियम व्हेंचर या नावाने संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून हिंजवडी येथील ७१ गुंठे मोकळ्या जागेवर बांधकाम प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कर्ज घेयचे होते. त्यासाठी फिर्यादी यांनी त्यांचे ओळखीतील एसबीआय बॅंकेच्या पिंपरी शाखेतील मॅनेजर आणि आरोपी शहाबाज जाफर यांची भेट घेतली. कर्ज प्रकरण मंजूर करु असे आरोपी जाफर यांनी सोमानी यांनी सांगितले आणि त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे असलेली फाईल स्वत: कडे ठेवली. त्यावर फिर्यादी यांच्या खोट्या सह्या करुन आणि फिर्यादी यांची कोणतीही परवानगी न घेता २५ कोटी रुपये कर्ज मंजूर केले. तसेच आरोपी मॅनेजर शहाबाज याने त्याच्या ओळखीचे बांधकाम व्यवसायिक आणि आरोपी विजय रायकर यांच्या खात्यात ६.५ कोटी तर मंदाकिनी नलावडे यांच्या खात्यात ६.५ कोटी असे एकूण १३ कोटी रुपये रक्कम जमा करुन ते पैसे लाटले. त्यातील एकही रुपये सोमानी यांच्या खात्यात जमा करण्यात आला नाही.

दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने सोमानी पुन्हा बॅंकेत फिरकले नाहीत. मात्र लॉकडाऊन संपताचा सोमानी यांना बॅंकेने १० .४४ कोटी रुपये कर्ज थकबाकी थकल्याची नोटीस पाठवली. मात्र कर्ज घेतलेच नाही तर कर्ज थकले कसे असा प्रश्न उपस्थित करुन सोमानी यांनी बँकेशी संपर्क साधला. त्यानंतर बॅंकेने शहाबाज यांची अंर्तगत चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र त्यानंतरी सोमानी यांना सातत्याने कर्ज थकबाकी प्रकरणी नोटीसा येत होत्या. या त्रासाला कंटाळून सोमानी यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपींनी मिळून फिर्यादी यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जाफर यांच्यावर या आधीही फसवणूक केल्याप्रकरणी बॅंक व्यवस्थापनाकडून यापूर्वी दोन वेळा चौकशी करण्यात आली होती. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मयुर वैरागकर करत आहेत.