काँग्रेस स्टेअरिंग कमिटीत शशी थरूर यांना डावलले

0
219

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) : नुकतीच काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत दोन उमेदवार रिंगणात होते खासदार मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार शशी थरूर अध्यक्षपदासाठी रिंगणात होते. यामध्ये शेवटी खर्गे यांनी बाजी मारली. आता अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर खर्गे अॅक्शनमोड मध्ये आले आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस वर्किंग कमिटीच्या जागी नवीन स्टेअरिंग कमिटीची घोषणा नवनिर्वाचित अध्यक्ष खर्गे यांनी केली आहे.

काँग्रेसच्या या नव्या स्टेअरिंग कमिटीत एकूण 47 सदस्यांचा समावेश आहे. या कमिटीमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि वायनाड मतदारसंघाचे खासदारराहुल गांधी व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह, ए.के. अ‍ॅन्टोनी, पी. चिंदबरम, दिग्विजय सिंह, अभिषेक मनु सिंघवी, अजय माकन, अंबिका सोनी, आनंद शर्मा, अविनाश पांडे, हरीष रावत, जयराम नरेश, जितेंद्र सिंह, शैलजा, के.सी. वेणुगोपाल, लालथनवाला, मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला, रघुवीर मिना, ओमन चंदू, तारीक अनवर, चेल्ला कुमार, अजय कुमार, अधीर रंजन चौधरी, भक्तचंदन दास, देवेंद्र यादव असे २९ सदस्य आहेत. मात्र, यामध्ये विशेष बाब म्हणजे खर्गे यांच्याविरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढवलेले शशी थरूर यांचा या कमिटीमध्ये समावेश करण्यात आलेला नाहीये. यामुळे आता आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवलेल्या उमेदवाराचीच आता नवीन स्टेअरिंग कमिटीची निवड न झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे आता शशी थरूर यांना काँग्रेसमध्ये डावललं जातंय का? अशी चर्चा होत आहे. खर्गे हे गांधी परिवाराच्या जवळचे समजले जातात, तर थरूर हे स्वतंत्र बाण्याचे नेते अशी त्यांची ओळख आहे. यामुळेच शशी थरूरांना डावललं का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

येत्या दोन वर्षांत मल्लिकार्जून खरगे यांच्यासमोर १९ राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठे आव्हान असणार आहे. त्यात राजस्थानचाही समावेश आहे. तेथे सध्या काँग्रेसचे सरकार आहे. हे सरकार वाचवण्याचे आव्हानही खरगे यांच्या खांद्यावर असणार आहे.