काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही आमदार संपर्कात – देवेंद्र फडणवीस

0
179

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील काही आमदार सध्या भाजपाच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक विधान केलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल, असं ते म्हणाले. ‘मुंबईतक’ वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
आमदार नेहमीच संपर्कात असतात. मागच्या पाच वर्षात बघितलं तर सत्ताधारी पक्ष म्हणू काम करताना अनेकांशी संबंध निर्माण झाला आहे. या संबंधामुळे आणि आत्मविश्वासामुळे अनेक लोक बरोबर येतात. त्यामुळे आमच्या संपर्कात अनेक जण आहेत, त्यातील किती लोक भाजपात येतील हे आज निश्चित सांगता येणार नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी संपर्कात असलेल्या आमदारांच्या भाजपाप्रवेशाच्या वेळेचाही उल्लेख केला. “आमदारांबरोबर असलेल्या संपर्काचं नात्यामध्ये परिवर्तन होण्याची वेळ यायची आहे. ही वेळ निवडणुकीच्या तोंडावर येईल.” असं ते म्हणाले. यावेळी बोलताना भाजपाला आणखी आमदारांची गरज आहे का? असं विचारलं असता, “गरज कधीच संपत नसते. खरं तर आम्ही सक्षम आहोत, पण शेवटी आम्ही प्रयत्न करत राहणार”, असं त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या बेताल वक्तव्यांवरही भाष्य केलं. “हा सर्व प्रकार थांबावायचा असेल तर यासाठी एक चांगला उपाय आहे. पण यासाठी माध्यमांनी जबाबदारी घ्यायला हवी. माध्यमांशी रोज सकाळी संजय राऊतांकडे जाणं बंद करावं. त्यामुळे ही समस्या निर्माण होते. जर तुम्ही त्यांच्याकडे जाणं बंद केलं तर तुम्हाला राज्याचं राजकारण स्वच्छ झालेलं दिसेल”, असं ते म्हणाले.