नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) : काँग्रेस पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाही, असं मोठं विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलं आहे. बंगळुरु इथं सुरु असलेल्या विरोधकांच्या बैठकीत त्यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळं देशाचं राजकारण आणखी वेगळं वळण घेण्याची शक्यता आहे.
भाजप विरोधात देशातील २६ विरोधीपक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्याने निवडणुकित तेच पंतप्रधानपदावर दावा सांगतील, अशी सर्वांच्या मनात धास्ती होती. प्रत्यक्षात काँग्रेसनेच या स्पर्धेतून अंग काढून घेतल्याने भाजप विरोधातील एकजूट फुटण्याची शक्यता राहिलेली नाही. त्या अर्थाने खर्गे यांचे विधान हे अत्यंत महत्वाचे समजले जाते.
दरम्यान, या विषयावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लोकसभेत एकजूट कायम राहिली तर विरोधकांचे ३५० खासदार होतील, असा आशावाद व्यक्त केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपविरोधकांची सोमवार (ता. १७)पासून दोन दिवशीय बंगळुरू येथे बैठक होत आहे. पहिल्या दिवशी राज्यातून या बैठकीला शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रसचे शरद पवार आज मंगळवारी (ता. १८) उपस्थित राहणार आहेत. यासाठी ते सकाळी रवाना झाल्याची माहिती आहे. पवारांच्या उपस्थित भाजपविरोधकांची रणनीती ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.