काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदेंना लेकिसह भाजपची ऑफर

0
123

सोलापूर, दि. १७ (पीसीबी) – माझा दोन वेळा पराभव झाला तरी देखील मला किंवा प्रणिती शिंदे यांना भाजपकडून पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी केला आहे. अक्कलकोट येथील एका कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी हे विधान केलं आहे. यानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिंदे येणार असतील तर त्यांचं स्वगतच केलं जाईल अशी प्रतिक्रिया दिल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे.

अक्कलकोट येथील एका कार्यक्रमात बोलताना सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, प्रणितीताई किंवा मला भाजपकडून ऑफर दिली जाते. पण ते कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो, जिथं आमचं बालपण गेलं, आमचं तारुण्य गेलं आता मी ८३ व्या वर्षात आहे. आता कसं दुसऱ्याचं घर उभं करणार. शक्य नाही आणि प्रणिती देखील तुम्हाला माहिती आहे ती देखील कधीही पक्ष बदलण्याच्या भानगडीत पडणार नाही. असं राजकारणामध्ये होतं राहतं.

दरम्यान सुशिल कुमार शिंदेंच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले की, सध्या मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोकांना काँग्रेसमध्ये आपलं भविष्य नाही असं वाटायला लागलं आहे. देशाचा विश्वास मोदींवर आहे. त्यामुळे सहाजिक आहे. सुशिलकुमार शिंदे हे काँग्रेसमधील मोठे नेते आहेत, त्यांना कोण बोललं याचा खुलासा त्यांनी केला नाहीये. पण आमच्याकडे अनेक लोकं आमचा विचार करा, पक्षामध्ये घ्या, आमचं बोलणं करून द्या असे म्हणत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाल्याचे पाहायला मिळेल.