थेरगाव, दि. १९ (पीसीबी) : काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांच्याविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा शिवसेनेच्या सर्व महिला आघाडी, युवती सेना, फादर बॉडी, युवा सेना, सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी डांगे चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन केले.
जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, खंडूशेठ चिंचवडे, दिलीप पांढरकर, महिला जिल्हा संघटिका शैला पाचपुते, शहर संघटिका सरिता साने, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख निलेश तरस, देहूरोड शहर प्रमुख दीपक चौगुले, महिला युवती सेना रितू कांबळे, उपयुक्त सेना सायली आळवे, युवा सेना शहर प्रमुख माऊली जगताप, चिंचवड विधानसभा संघटिका शारदा वाघमोडे, चिंचवड विधानसभा उपसंघटिका सुनीता चंदने आदी उपस्थित होते.
काँग्रेस लाडक्या बहिणींचा सावत्र भाऊ आमचे पैसे नका खाऊ, सुनील केदारचे करायचे काय खाली डोकं वर पाय, लाडक्या बाहिणींचा दुष्ट भाऊ केदार तुला आम्ही निवडणुकीत पाडू, बँक घोटाळ्याचा आरोपी लाडक्या बहिणींची केदारला पोटदुखी, मिळून साऱ्या बहिणी काँग्रेसला पाजू पाणी अशा घोषणा देत काँग्रेस पक्ष आणि सुनील केदार यांच्या विरोधात आंदोलन केले.
जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर म्हणाले, “सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता असून शासनाची कोणतीही योजना राबवता आली नाही. सावत्र भाऊ बहिणींचे पैसे खाण्याचे काम करतो. येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. भविष्यकाळात मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे राहतील.”
शहर प्रमुख निलेश तरस म्हणाले, “काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी बेताल वक्तव्य केले आहे. त्यांचा जाहीर निषेध करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू ठेवली आहे. लाखो माता भगिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. योजनेतून मिळालेल्या पैशातून महिलांना मदत झाली आहे त्यामुळे राज्यातील महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे उभ्या आहेत या सावत्र भावाला पिंपरी चिंचवड शहरात आल्यावर आम्ही शिवसैनिक काळे फासणार आहे.”
शहर संघटिका सरिता साने म्हणाल्या, “काँग्रेस पक्षाचा व सुनील केदार यांचा जाहीर निषेध करते. ही योजना चालू राहण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे आहोत.”