काँग्रेसला मोठा धक्का … गुलाम नबी आझाद यांच्यानंतर आणखी पाच नेत्यांंचा राजीनामा

0
225

दिल्ली, दि. २६ (पीसीबी) : काँग्रसेचे जेष्ठ नेते आणि काश्मिरातील नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेसमधील सदस्यत्वाचा आणि आपल्या सगळ्या पदाचा राजीनामा दिला. काँग्रेसमध्ये पडझड चालू असताना आझाद यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान आझाद हे बाहेर पडून आपला पक्ष स्थापन करणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या समर्थनार्थ काश्मीर मधील आणखी पाच काँग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

जीएम सरूरी, हाजी अब्दुल रशीद, मोहम्मद अमीन भट्ट, गिलजार अहमद वानी आणि चौधरी मोहम्मद अकरम अशी या पाच नेत्यांची नावे असून त्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ आपल्या पक्षातील पदाचा राजीनामा दिला आहे.

राजीनामा दिल्यानंतर अंदाज लावला जात होता की आझाद हे भाजप मध्ये प्रवेश करतील. पण त्यांनी स्पष्ट केलं की, “मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून गेल्या तीन वर्षापासून विरोधी पक्षातील काही लोकांनी मोकळ्यात अफवा उठवल्या होत्या की मी भाजप मध्ये प्रवेश करणार आणि प्रवेश केल्यानंतर मला राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती बनवणार पण तसं काही नाही, मी काश्मीर मध्ये जाणार आणि नवा पक्ष काढणार आहे. लवकरच आम्ही राष्ट्रीय स्तरावर दिसू.” असं आझाद बोलताना म्हणाले आहेत.