काँग्रेसमध्ये मोठा भूकंप, विधीमंडळ नेतेपदाचा बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा

0
164

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून प्रदेश काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आलाय. सत्यजित तांबेंच्या वतीनं आता त्यांचे मामा बाळासाहेब थोरात दंड थोपटून मैदानात उतरलेत. नाना पटोले यांच्या विरोधातली नाराजी त्यांनी बोलून दाखवली. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेत्याचा राजीनामा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत खदखद दिसून येऊ लागली आहे. अशातच नाशिक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही घडलं त्यानंतर काँग्रेसमध्ये नेत्याची नाराजी बाहेर दिसू लागली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीवेळी पक्षाने दिलेल्या चुकीच्या एबी फॉर्मवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. याशिवाय बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यांच्या या पत्रानंतर पक्षासह राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला.