काँग्रेसने एकहाती राखली सत्ता, बच्चू कडूंच्या प्रहारसह सेनेचा सुपडा साफ, पहिल्यांदाच घडवला इतिहास

0
217

अमरावती, दि. २९ (पीसीबी) – राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा निकाल हाती आला आहे. यातल्या तिवसामधील मतमोजणी पूर्ण झाली आहे. तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या सर्व 18 जागांचे निकाल हाती आले असून 18 पैकी 18 जागांवर आमदार यशोमती ठाकूर गटाचा विजय झाला आहे, यामुळे तिवसा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि प्रहारचा धुव्वा उडाला आहे.

या विजयानंतर तिवस्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाने मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला. तिवसा बाजार समितीत काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना एका बाजूला तर राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट, बच्चू कडू यांची प्रहार यांनी निवडणूक लढवली होती.

यवतमाळमधील दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांना आपल्याच होमग्राऊंडमध्ये धक्का बसला आहे. ठाकरे गटाने संजय राठोड यांच्या समितीचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला आहे. दिग्रस बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. संजय देशमुख, माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन महाविकास आघाडीला 18 पैकी 14 जागी विजयी मिळवला आहे. तर संजय राठोड गटाचे फक्त 4 संचालक निवडून आले आहेत.