काँग्रेसचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह दोटासरा यांच्या घरी ईडी दाखल

0
280

– काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या अपक्ष आमदार हुडला यांच्यावरही छापा

जयपूर, दि. २६ (पीसीबी) – राजस्थानची निवडणूक जाहीर होऊन आता प्रचारात रंगत आली असताना अचानकच राजस्थानमधील पेपर लीकप्रकरणी ईडी काँग्रेसचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह दोटासरा यांच्या घरी दाखल झाली आहे. पेपर लीकप्रकरणी ईडीने आज राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. दुसरीकडे अपक्ष आमदार ओमप्रकाश हुडला यांच्या निवासस्थानावरही ईडीने छापे टाकले आहेत. यामुळे राजस्थान राजकारणात खळबळ उडाली आहे.
आज पहाटे ईडीने काँग्रेस नेते दोटासराच्या सीकर आणि जयपूर येथील निवासस्थानावर छापे टाकले. एकूण 12 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. जयपूरमध्ये तीन आणि सीकरमध्ये दोन ठिकाणी ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे, तर अपक्ष आमदार हुडला यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी ईडीचे पथक पोहोचले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज दुपारी पत्रकार परिषद बोलावली आहे. गेहलोत ईडीच्या छाप्यांवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुकतेच काँग्रेसने अपक्ष आमदार हुडला यांना महुवा या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. हुडलांनी गेहलोत सरकारला समर्थन दिले होते. पहिल्यांदाच ईडीने आमदार हुडलांवर छापा टाकला आहे. हुडला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ते ईडीचे लक्ष्य बनल्याचे बोलले जात आहे. भाजप खासदार किरोरीलाल सातत्याने पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित करत आहेत. हुडला आणि किरोरी हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात.

यापूर्वी ईडीने सीकरमधील ‘कलाम कोचिंग’वर रडावर घेतले होते. कलाम कोचिंग हे काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. छाप्यात ईडीला काही महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत याच पुराव्याच्या आधारे ईडीने पीसीसी प्रमुख गोविंद सिंग दोतासराच्या निवासस्थानावर छापा टाकल्याचे मानले जात आहे.

लोक या कारवाईचा संबंध काँग्रेसच्या एका ज्येष्ठ आणि ताकदवान नेत्याशीही जोडत आहेत. कलाम कोचिंगमध्ये काँग्रेसच्या नेत्याचे कुटुंबीयही भागधारक असल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या RPSC भरतीतील घोटाळ्याच्या संदर्भातही ईडीच्या या छाप्याकडे पाहिले जात आहे. कलाम कोचिंगचे नाव राजस्थान विधानसभेतही गाजले होते. भरती परीक्षेत एकाच वेळी अनेक निवडी दिल्यामुळे हे कोचिंग यापूर्वीही चर्चेत आले आहे.

राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील महुवा येथील अपक्ष आमदार ओमप्रकाश हुडला यांना काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळेच त्यांच्यावर ईडीने छापे टाकले होते, अशी चर्चा करण्यात येत होती. ईडीच्या या कारवाईबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. मात्र, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

भाजपचे खासदार डॉ. किरोरीलाल मिणा यांनी नुकतीच ईडीकडे केलेली तक्रार आणि काही कोचिंग स्टाफने ईडीला दिलेली माहिती यावरून या कारवाईला वेग आल्याची माहिती आहे. आमदार ओमप्रकाश हुडला यांच्या भावावर 26 जुलै 2022 रोजी एका विद्यार्थ्याला बनावट उमेदवार दाखवून परीक्षा देण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या भावालाही अटक केली होती.