काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे यांचा राजीनामा

0
280

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे यांनी प्रदेश सचिवपदासह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साठे यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसू शकेल.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राजीनामा पत्र पाठविले आहे. त्यात साठे म्हणाले, मी गेल्या २६ वर्षांपासून निष्ठेने काँग्रेस पक्षाचे काम करत आहे. माल, गेल्या काही दिवसांपासून पक्षीय पातळीवर माझी मोठ्या प्रमाणावर घुसमट होत आहे. पक्षाच्या व्यासपीठावर वेळोवेळी अनेक मुद्दे मी मांडले, त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. शहर पातळीवरील पक्षहितासाठी अनेक विषय उपस्थित केले, त्याचीही दखल घेतली गेली नाही. पक्षाकडून अश्या प्रकारे होणारी माझी उपेक्षा मी सहन करू शकत नाही. अशा परिस्थितीत आपण यापुढे पक्षात थांबणे योग्य नाही, अशी भावना झाल्याने मी स्वखुशीने राजीनामा देत आहे.

मी १९९७ पासून अर्थात माझ्या विद्यार्थी दशेपासून काँग्रेस पक्षाचे काम करत आहे. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी (यू. आर) होतो. कबड्डीचा राष्ट्रीय खेळाडू होतो. खेळाडू असताना राजकारणात प्रवेश झाला. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षात काम करण्याचे समाधान मोठे होते. पुढे, एन.एस.यू.आय. चा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपदावर काम केले. २०१४ ते २०२० या साडे सहा वर्षांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्षपद भूषवले. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचा निरीक्षक म्हणून काम केले. सध्या प्रदेश सचिव पदाची जबाबदारी आहे. अशाप्रकारे काँग्रेसच्या विविध पदांवर आतापर्यंत निस्वार्थीपणे, प्रामाणिकपणे काम केले. मात्र, जी उपेक्षा अलिकडच्या काळात माझी झाली त्यामुळे, यापुढे काँग्रेसचे काम करण्याची मानसिकता राहिली नाही. तरी स्वखुशीने प्रदेश काँग्रेसचे सचिव पद आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा मी राजीनामा देत आहे.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी भाजपचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी पक्षाला रामराम केला आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कामठे यांच्यामुळे पिंपळे निलख भागात भाजपला फटका बसणार आहे. आता सचिन साठे यांच्यासारख्या बड्या नेत्याने काँग्रेस पक्षाकडे नाराजी व्यक्त केल्याने महाआघाडीला झटका बसला आहे. साठे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.