काँग्रेसचे दोन नेते होणार शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळात मंत्री

0
234

– महाराष्ट्रातील काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, राजकिय वर्तुळात मोठी खळबळ

मुंबई, दि. २ (पीसीबी) : महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा काँग्रेस पक्ष असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. काँग्रेसमधील काही आमदार फुटणार असून त्यात काही माजी मंत्र्यांचा समावेश आहे. त्यातील दोन माजी मंत्र्यांना शिंदे सरकारच्या पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती.

शिंदे-फडणवीस सरकारचा पुढच्या महिन्यांत म्हणजेच ऑक्टोबरमध्ये मंत्रिमडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात सुमारे २० जणांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते. त्यात काँग्रेस गटातील काही नेते मंत्री होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेसमधील दोन माजी मंत्र्यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची लॉटरी लागणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. त्यामुळे काँग्रेस आमदार कधी फुटणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीपासूनच काँग्रेसमधील एक गट फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा राज्यात होती. विधान परिषद निवडणुकीतही काँग्रेस पक्षाचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्याचवेळी काँग्रेसधील काही आमदार नाराज असल्याचे दिसून आले होते. त्याच निवडणुकीत काँग्रेस पक्षाची सातहून अधिक मते फुटली हेाती.

विधान परिषद निवडणुकीनंतरच शिवसेनेत उभी फुटली होती. त्यानंतर राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले होते. या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे तब्बल १० ते १२ आमदार उशिरा विधानसभेच्या सभागृहात पोचले होते. त्यावेळी त्यांना बाहेरच उभे राहावे लागले होते. यामध्ये एका माजी मुख्यमंत्र्यांचा आणि बड्या नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. याबाबतचा जाब काँग्रेस हायकमांडने राज्यातील एका जबाबदार नेत्याला फोन करून विचारला होता. त्यानंतर संबंधित आमदारांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आलेली आहे.

दरम्यान, आगामी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी काँग्रेसमधील एक गट फुटून शिंदे गटात सामिल होणार की भाजपमध्ये जाणार याकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष असणार आहे. शिंदे सरकारमध्ये सामील होणारे माजी मंत्री कोण? असा सवाल पुढे येत आहे.