काँग्रेसची उमेदवारी भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना

0
288

मुंबई, दि. ८ (पीसीबी) : विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. काँग्रेसने दोन्ही जागांवर मुंबईकरांना संधी दिली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संख्याबळानुसार काँग्रेसचा एक उमेदवार सहज विजयी होणार आहे. तर, दुसऱ्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह इतरांची मदत काँग्रेसला घ्यावी लागणार आहे.

काँग्रेसकडून विधान परिषदेवर कोणाला संधी मिळणार याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. मात्र, काँग्रेस नेतृत्वाने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना संधी दिली. काँग्रेसकडून मराठा आणि अनुसूचित जाती घटकातील उमेदवारांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

मुंबई महापालिकेवर लक्ष?
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठीची चाचपणीदेखील सुरू झाली आहे. या महत्त्वाच्या निवडणुकीत मुंबई काँग्रेसला बळ देण्यासाठीच काँग्रेस नेतृत्वाने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना संधी दिली असल्याची चर्चा आहे. चंद्रकांत हंडोरे यांनी मुंबईचे महापौरपदही भूषवले आहे. त्याशिवाय मागासवर्गीय घटकातील काँग्रेसचा चेहरा अशीही त्यांची ओळख आहे. तर, कामगार नेते असलेल्या भाई जगताप यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. काँग्रेसमधील आक्रमक चेहरा अशी त्यांची ओळख आहे.