कष्टाने राज्याच्या विकासात वाटा उचलणाऱ्या वडार समाजाला न्याय देऊ – आ. नाना पटोले

0
77

पिंपरी, दि. ०१ (पीसीबी) : आपल्या कष्टाने रस्ते धरणे प्रशासकी इमारती बांधून राज्याच्या विकासात वाटा उचलणारा पण न्यायापासून वंचित,उपेक्षित वडार समाजाला आगामी काळात योग्य आरक्षणासह शासनाकडून पूर्ण न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांनी वचन दिले आहे. वडार समाज संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जगन्नाथ फुलारे यांच्या नेतृत्वात व काँग्रेस पदाधिकारी संदिप शिंदे यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रभरातील प्रमुख वडार प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन रविवारी(दि.29) ओबीसी नेते प्रा.भानुदास माळी यांच्या अध्यक्षतेत मुंबईतील टिळक भवन येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी आ.नाना पटोले बोलत होते.

वडार समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष जगन्नाथ फुलारे यांच्या प्रास्ताविकातून समाजाच्या मागण्या आणि आवश्यकता कथन करण्यात आले. त्यानंतर वडार साहित्यिक टी एस चव्हाण यांचे अभ्यास पूर्ण मांडणीसह डॉ श्रावण रॅपनवाड,मनोहर विटकर, श्याम विटकर, संदीप शिंदे महादेव कुसाळकर,संजय देवकर, प्रिया बंडगर,वसंत शिंदे आदींसह अनेकांनी मनोगत मांडले.

आ. नाना पटोले वडार प्रतिनिधींना संबोधित करताना म्हणाले की, वडार समाज हा आपल्या कष्टाने दळणवळणाचे रस्ते सिंचनाचे मोठाले धरणे टोलेजंग प्रशासकीय इमारती बांधून या राज्याच्या व देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलणारा समाज आहे. दुर्दैवानं या समाजाला आरक्षणासह शासनाचा लाभ न मिळता सर्वात शेवटचा घटक बनला आहे. आगामी काळात वडार समाजाच्या उत्थानासाठी आरक्षणासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ या समाजाला मिळाल्या पाहिजेत यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील. वडार समाज कार्यकर्त्यांना सत्तेचा लाभ मिळाला पाहिजे याची दक्षता घेण्यात येइल असे अभिवचन यावेळी नाना पटोले यांनी दिले. या प्रतिनिधी सभेला सेल विभाग प्रमुख प्रज्ञा वाघमारे,कार्याध्यक्ष रामचंद्र मंजुळे, अशोक कुलाल, वडार उद्योगपती राजू जाधव,वसंतराव शिंदे, डॉ. वसंत वल्लेपवार,रमेश जेठे, संजय शिरापूरे, दत्तू अण्णा बंदपट्टे,बाबण्णा कुसाळकर, सोनाजी गायकवाड,डॉ. दीपक शिंदे,श्रीकांत कुंडटवाड आदींसह महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.