पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – राज्यातील कष्टकरी कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शिंदे – फडणवीस सरकारला येऊन पाच महिने झाले. तरी, अद्याप एकही बैठक, एकही निर्णय या कष्टकरी कामगारांच्या बाबतीत घेण्यात आलेला नाही. कष्टकरी कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा, म्हातारपणी पेन्शन योजना व विविध लाभ देण्यात यावे,अशा विविध मागण्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये कष्टकरी कामगारांचा भव्य मोर्चा नागपूर येथे काढण्यात येणार असल्याची माहिती कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिली.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार समन्वय समिती, नॅशनल हॉकर फेडरेशन, बांधकाम कामगार समन्वय समितीतर्फे आज (बुधवारी) बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वानुमते मोर्चा काढण्याचा ठराव करण्यात आला. कार्याध्यक्ष इरफान चौधरी, प्रदेश संघटक अनिल बारवकर,राजू बिराजदार, माधुरी जलमुलवार, विनोद गवई, अर्चना कांबळे, निरंजन लोखंडे, मुमताज शेख, सखाराम केदार, मुमताज पठाण, इंदुमती उजागरे, रजनी जोगदंड,चंद्रकला दौंडकर,सुनीता देवकर,सीमा ताठे,सरस्वती प्रधान,मंगल ठोंबरे,वर्षा डावरे,विमल भोसले यांचेसह विविध ठिकाणचे पदाधिकारी उपस्थित होते.
नखाते म्हणाले की, देशभरामध्ये 45 कोटी पेक्षा अधिक संख्या असलेल्या बांधकाम कामगार,घरेलू कामगार, फेरीवाला,रिक्षा चालक, वाहन चालक,कंत्राटी कामगार,शेतमजूर,सफाई कामगार असे सर्व घटक राज्याच्या विकासामध्ये आपले योगदान देत आहेत. मात्र या असंघटित कामगारांकडे नेहमीच दुर्लक्ष झालेले आहे. असंघटित कामगारांचे अपघाती मृत्यू ,किमान समान वेतन, शासकीय नोंदणी , म्हातारपणी पेन्शन, मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याकडे राज्य व केंद्र शासन पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे. याचा जाब विचारण्यासाठी व कामगारांच्या हक्काचे कायदे निर्माण व्हावेत. त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद करावी अशा विविध मागण्या घेऊन नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे.
यामध्ये कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार समिती,सारथी चालक-मालक महासंघ यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कामगार बांधव,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. पुणे जिल्ह्यातील संघटित कामगारांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मोर्चाचे समन्वयक किरण साडेकर यांनी केले आहे.