कशाला मी पुण्याचा पालकमंत्री झालो… जो तो उठतो आणि मला उपदेश देतो…

0
5

दि. ९ . (पीसीबी) – अभिनेता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असलेल्या सयाजी शिंदे यांचा आज 66 वा वाढदिवस साजरा होत असून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये संपन्न झाला. या सोहळ्यात अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली. त्यामुळे, आज सकाळपासूनच अजित पवारांनी सुरू केलेला पुण्याचा दौरा संध्याकाळीही गाजवला. कारण, येथे भाषण करताना अजित पवारांनी ट्री मॅन सयाजी शिंदेंसाठी गाणं गायलं, तर, सभागृहात एका सामाजिक कार्यकर्त्याने वृक्षारोपणासंदर्भाने एक प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर बोलताना कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, असं वाटायला लागलंय, जो तो उठतो आणि मला उपदेश देतो, असे म्हणत त्याची फिरकीही घेतली.

आपण प्रत्येक वर्षी 25 कोटी वृक्षारोपण करण्याचा संकल्प आहे, असं आमच्या सत्ताकाळात आम्ही 100 कोटी झाडं लावणार आणि जगवणार आहोत. प्रत्येक वर्षी आपण असं करत राहिलो तर पुढच्या 20 वर्षांत आपण सरासरी निसर्ग राखण्यात यशस्वी होऊ, असे म्हणत अजित पवारांनी सयाजी शिंदेंच्या वृक्षारोपण कार्याचं कौतुक केलं. सागर कारंडे जेंव्हा आईचं पत्र वाचन करत होते, तेंव्हा सयाजी शिंदेंचे डोळे पाणावले होते, आई हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. सयाजी हा रांगडा गडी आहे, जिथं असेल तिथं त्यांच्यातील हा रांगडेपणा दिसून येते. शिंदे आणि माझ्यात ‘हे’ साधर्म्य, म्हणून आमची वेव लेंथ जुळली, असेही अजित पवारांनी म्हटले.

सयाजी शिंदेंसाठी अजित दादांनी गाणं गायलं.
सयाजी शिंदेंमध्ये सह्याद्रीच्या मातीतील रांगडेपणा आहे. हा रांगडेपणा त्यांच्या अंगात अक्षरशः भिनलेला आहे. स्पष्ट सडेतोडपणे बोलणं, जसं दिसणं आहे, तसं वागणं आहे. जे पोटात तेच ओठात आहे, हा अस्सलपणा सयाजीरावांमध्ये आहे. त्यांच्यात आणि माझ्यातला हाच गुण सारखा असल्यानं, माझे आणि त्यांची वेव लेंथ जुळलेली आहे, असे म्हणत अजित पवारांनी सयाजी शिंदेंसाठी पिंजरा या मराठी चित्रपटातलं गाणं गायलं. यानिमित्ताने मला एक गाणं आठवतं असे म्हणत अजित पवारांनी ‘गडी अंगाने उभानी आडवा, त्याच्या रुपात गावरान गोडवा’, हे गाणं म्हटलं.

पिंपरी ते चाकणचा मार्ग आम्हाला सहा-सहा असा बारा पदरी रस्ता करावा लागणार आहे. वर पूल सहा लेनचा आणि त्यावर मेट्रोही करतोय. मी कामाचा माणूस असल्यानं मी अधिकाऱ्यांना कामालं लावलेले आहे. कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, असं वाटायला लागलंय अशी मिश्कील टिपण्णी अजित पवारांनी केली. येथील सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी एक प्रश्न विचारला होता. शहरातील नदी लगतची, दुर्गा देवी टेकडीवरची वृक्षतोड होणार आहे, आपण पालकमंत्री म्हणून ही वृक्षतोड थांबवावी अशी अपेक्षा भापकर यांनी व्यक्त केली. त्यावर, बोलताना अजित पवारांनी मिश्कील फटकेबाजी केली. हे सगळं ऐकल्यावर कुठून मी पुण्याचा पालकमंत्री झालो, असं मला वाटायला लागलं आहे. जो तो उठतो आणि मला उपदेश देतो. सगळा मक्ता मीचं घेतलाय, ह्यांनी फक्त उपदेश द्यायचे. ठीक आहे, धन्यवाद असे अजित पवारांनी म्हटले. त्यानंतर, सभागृहात एकच हशा पिकला.