कल अजितदादांच्या विकास कामाच्या बाजूने – सुनेत्रा पवार

0
181

बारामती, दि. १२ (पीसीबी) – बारामतीत राजकिय दृष्ट्या पणदरे गावाला विशेष महत्व आहे. स्वाभिमानी शेतकरी आणि स्वातंत्र सैनिकांचे हे गाव आहे. या पणदरेकरांचा कल अजितदादांच्या विकास कामाच्या बाजूने आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचा उमेदवार विजयी होण्यास मोठी मदत होणार आहे, असा ठाम विश्वास बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. बारामती लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीची पहिली निवडणूक कचेरी पणदरे येथे आजपासून सुरू झाली. या कचेरीचे उद्घाटन प्रसंगी आयोजित सभेत सुनेत्रा पवार बोलत होत्या.

माळेगाव कारखान्याचे प्रमुख अॅड.केशवराव जगताप सभेच्या अध्यक्षस्थानी होते. दरम्यान, पवार कुटुंबियांमधील दोन उमेदवार परस्परविरोधी निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीकडे राज्याचेच नव्हे, तर देशाचे लक्ष लागले आहे, असे यावेळी अनेकांनी बोलून दाखविले. तोच धागा पकडत सौ. सुनेत्रा पवार म्हणाल्या,कै. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात विकासाचा पाया रचला. चव्हाणसाहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाचा आणि विकासाचा वारसा अजितदादांनी पुढे नेण्याचे ठरविले आहे. या विकास प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकाने पुढे आण्यासाठीच अजितदादांनी व राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीच्या नेतेमंडळींनी मोदीसाहेबांचे नेतृत्व स्वीकारले. मला खात्री आहे, की बारामती तालुक्याची विकासाची घौडदौड देशात अधिक गतीने पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तत्पुर्वी अॅड. केशवराव जगताप, योगेश जगताप यांनी पणदरेकरांच्यावतीने राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचा उमेदवाराला मोठ्या मताधिंक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादीचे संभाजी होळकर, दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे, संदीप जगताप, योगेश जगताप, सचिन सातव, तानाजी कोकरे, नितीन जगताप, स्वप्नील जगताप, रोहित कोकरे, अॅड.सनी जगताप, संगिता कोकरे, दत्तात्रेय येळे, सुनिल पवार, अशोकराव जगताप, सरपंच अजय सोनवणे, उपसरपंच मनोज जगताप, अशोकराव मुळीक, अभय शहा, अमरसिंग जगताप, ज्योती लडकत, सौ. पाटोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार भाग्यश्री धायगुडे यांनी मानले.

प्रचाराची व्युहरचना झाली स्पष्ट…
महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादांचा दबदबा राहण्यासाठी बारामती लोकसभा मतदार संघातील घड्याळ चिन्हावर लढणारा उमेदवाराला जिंकूण आणाचे आहे. त्यामुळे या मतदार संघात इतरांवर टिका-टिपणी करायची नाही, तर सामान्य मतदार केंद्रबिंदू मानून गावोगावी झालेला विकास लोकांपुढे मांडायचा आहे. अर्थात ही प्रचाराची व्युहरचना अजितदादांना अपेक्षित आहे, अशी माहिती माळेगावचे संचालक योगेश जगताप यांनी दिली.