कल्याण डोंबिवलीत भाजपने शिंदेंची शिवसेनाच फोडली, बडे नेते गळाला

0
1

दि.१८(पीसीबी) – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपने फासे टाकायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील अनेक माजी नगरसेवकांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यापूर्वी भाजपकडून (BJP) प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. गेल्या काही तासांपासून कल्याण-डोंबिवलीत भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सरप्राईज देणार, अशी चर्चा सुरु होती. मात्र, भाजपमध्ये नेमके कोणते नगरसेवक प्रवेश करणार, याची माहिती समोर आली नव्हती. त्यामुळे राजकीय वर्तुळाला या पक्षप्रवेश सोहळ्याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला.

यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचे दिवंगत नेते वामन म्हात्रे यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हातात धरले. आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी विशेषत: श्रीकांत शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यावर आता शिंदे गट काय प्रतिक्रिया देणार आणि भाजपच्या या खेळीला प्रत्युत्तर देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री झाले होते. तेव्हापासूनच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष प्रचंड वाढला होता. या दोन्ही पक्षांमधली वाद विकोपालाही गेले होते. गेल्या काही काळात भाजपकडून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सातत्याने स्वबळाची भाषा केली जात आहे. त्यादृष्टीने भाजप पद्धतशीरपणे पावले टाकत असल्याचे सांगितले जाते. त्याचाच एक भाग म्हणून भाजपकडून कल्याण-डोंबिवली इतर पक्षातील नेत्यांना आयात करुन आपली संघटनात्मक ताकद वाढवली जात आहे. मात्र, मंगळवारी भाजपने श्रीकांत शिंदे यांच्या मर्जीतील नगरसेवकांना गळाला लावल्याने खळबळ उडाली आहे.

शिवसेना युवा नेते अनमोल वामन म्हात्रे आणि त्यांची पत्नी अश्विनी म्हात्रे यांनी रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अनमोल म्हात्रे हे शिवसेनेचे दिवंगत नेते आणि अनेक वर्षे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेल्या वामन म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत. वामन म्हात्रे हे पाच टर्म नगरसेवक व चार वेळा स्थायी समिती अध्यक्ष होते. यावरुन त्यांच्या सामर्थ्याची कल्पना येऊ शकते. कल्याण-डोंबिवलीत म्हात्रे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. वडिलांची ही राजकीय पुण्याई त्यांचा मुलगा अनमोल म्हात्रे यांच्या गाठिशी आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळेच भाजपने अनमोल म्हात्रे यांना गळाला लावल्याची चर्चा आहे. अनमोल म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशाची बातमी अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. आज सकाळी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळ्याला सुरुवात झाली तेव्हा अनमोल म्हात्रे यांनी शिंदे गटाला रामराम ठोकल्याचे स्पष्ट झाले.