कल्याणीनगर, मुंढवा कोरेगाव पार्कमधील ५४ हॉटेल्सवर कारवाई

0
136

पुणे : कल्याणीनगर येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील मोठी हॉटेल्स, रेस्टारंट, रूफटॉप हॉटेल्समधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका महापालिकेने सुरू केला आहे. त्यात अनधिकृत बांधकामे असलेली ६० ठिकाणे महापालिकेने निश्चित केली असून, त्यापैकी ५४ ठिकाणी केलेल्या कारवाईत ५४ हजार ३०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे बुधवारी हटवण्यात आली. कल्याणीनगर, मुंढवा, कोरेगाव पार्क, घोरपडी, पुणे रेल्वे स्थानक, विमाननगर परिसरातील हॉटेल्सवर कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून देण्यात आली.

कल्याणीनगर येथे झालेल्या भीषण अपघातानंतर शहरातील पबचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अपघातामधील अल्पवयीन आरोपीने पबमध्ये मद्य प्राशन केल्याचे आढळून आले होते. या प्रकारानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रूफटॉप हॉटेल्सचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हॉटेल्समधील अतिक्रमणांवरही कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत हॉटेल्समधील बांधकामे पाडून टाकण्यात आली. पाच विभागात ही कारवाई करण्यात आली.

अनधिकृत बांधकामे किंवा अतिक्रमणे असलेली ६० हॉटेल्सची यादी महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहे. त्यापैकी बुधवारी ५४ हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये तीन मोठ्या हॉटेल्सचा समावेश होता. तर छोटी हॉटेल्स, दर्शनी आणि सीमा अंतरातील ४४ हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. त्याशिवाय सात रूफटॉप हॉटेल्सवर कारवाई करण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली. कारवाई केलेल्या काही हॉटेल्सवर या पूर्वीही तीन ते चार वेळा कारवाई करण्यात आली होती.