कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह बार मालकाला अटक

0
147

पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटरसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या वडिसांसह बार मालक आणि मॅनेजरला अटक केली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, याप्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्याने सोमवारी त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तेव्हापासून ते फरार होते. पोलिसांकडून त्यांच्या शोध सुरू होता. यादरम्यान आज पहाटे त्यांना छत्रपती संभाजीनगर भागातून अटक करण्यात आली. याशिवाय बार मालक आणि मॅनेजरलाही अटक करण्यात आली. आरोपी १७ वर्षांचा अल्पवयीन असतानाही त्यांनी त्याला मद्य दिले, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

रविवारी पहाटे झालेल्या या अपघातानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते. त्यानंतर रविवारी दुपारी त्याला विशेष हॉलिडे कोर्टात हजर केले होते. त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात यावी तसंच आरोपी साडेसतरा वर्षांचा असल्याने त्याला प्रौढ समजून खटला चालवला जावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत आरोपीला जामीन मंजूर केला होता. तसेच अपघातावर ३०० शब्दाचा निबंध लिहावा, असे आदेश दिले होते.

देवेंद्र फडणवीसांनीही घेतली दखल
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या अपघाताची दखल घेत आरोपीवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. तसेच या अपघातातील आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याविरुद्ध अपील दाखल करण्याच्या सूचना पुणे पोलीस आयुक्तांना दिल्या असल्याची माहिती त्यांनी दिली होती. याबरोबरच या प्रकरणातील आरोपीला कोणती विशेष ट्रिटमेंट दिली असल्यास त्यावेळचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासून ते खरे असेल तर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करा, असे निर्देश देखील त्यांनी दिले होते.

कायद्यानुसार कारवाई केली जाईल – अमितेश कुमार
यासंदर्भात बोलताना पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आरोपीवर कायद्यानुसार कारवाई केली जात असल्याचे सांगितले होते. “कल्याणीनगर भागात काल घडलेली घटना अंत्यत दुर्देवी आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी दारू पिऊन कार चालवित होता. ही बाब स्पष्ट झाली असून या प्रकरणी आम्ही पब मालक, आरोपीचे वडील आणि विना नंबर प्लेट गाडी देणार्‍या शो रूमच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी हा कागदपत्रांच्या आधारे अल्पवयीन असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला न्यायालयाने काही अटींच्या आधारे जामीन दिला आहे. पण हा मुलगा खरच अल्पवयीन आहे का? याबाबतचा तपास आमची टीम शाळेत जाऊन करत आहे.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

याशिवाय “आम्ही आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी चर्चा होत आहे. पण आम्ही सर्व प्रकाराची कलम लावली आहेत. तरी देखील कोणी चर्चा करीत असेल तर समोरासमोर चर्चा करण्यास तयार आहोत, तसेच या प्रकरणी आम्ही कोणालाही सोडणार नाही. कायद्यापुढे सर्वजण समान आहेत”, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं होतं.