कल्याणमध्ये भाजप-शिंदे गटात बेदम हाणामारी; समर्थकांना लाथाबुक्क्यांनी चोपले

0
287

कल्याण, दि. १८ (पीसीबी) – राज्यात एकमेकांच्या गळ्यात गळे घालणाऱ्या भाजप व शिंदे गटामध्ये आज कल्याण पूर्वमध्ये तुफान राडा झाला. भिंतीवर कमळाचे चिन्ह काढण्यास विरोध करीत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्या समर्थकांना अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे कल्याणमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाने त्यांच्या औकातीत रहावे अन्यथा त्यांचे काम आम्ही करणार नाही, असा इशाराच भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिला.

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून प्रदेश भाजपने राज्यातील प्रत्येक वॉर्डमध्ये कमळाचे चिन्ह काढून ‘फिर एक बार मोदी सरकार’ असे घोषवाक्य लिहिण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कल्याण पूर्वमध्ये चक्कीनाका परिसरात एका भिंतीवर भाजपचे चिन्ह व घोषवाक्य लिहिण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी शिंदे गटाचे माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी तसेच विकास चौधरी यांचे समर्थक तेथे आले व कमळ चिन्ह भिंतीवर रंगवण्यास मनाई केली. त्यावरून भाजप कार्यकर्ते व शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले व दोघांमध्ये प्रचंड बाचाबाची सुरू झाली.

हा वाद एवढा विकोपाला गेला की, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या चार कार्यकर्त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही मारहाण माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी तसेच शिंदे गटाचे पदाधिकारी विकास चौधरी यांच्या सांगण्यावरूनच झाली असल्याचा आरोप भाजपचे कल्याण पूर्व अध्यक्ष संजय मोरे यांनी केला आहे. दोन्ही गटांमध्ये राडा झाल्यानंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात कार्यकर्ते दाखल झाले व त्यांनी परस्परांविरोधात तक्रार दाखल केली. भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यादेखील तेथे उपस्थित होत्या.

तुमच्या नगरसेवकांना आवरा अन्यथा हात-पाय तोडू

दोन्ही गटांतील वाद एवढा टोकाला जाऊन पोहोचला की, भाजपचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी शिंदे गटाला उघडपणे आव्हान दिले. तुमच्या नगरसेवकांना आधी आवरा अन्यथा हात-पाय तोडू अशी धमकीच मोरे यांनी दिली. आमच्या कार्यकर्त्यांना संधी दिली नाही तर आम्ही शिंदे समर्थकांची काम पुढे करणार नाही, असा इशारादेखील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे.