कलावती यांची मदत, राहुल गांधींनी नाही तर मोदींनी केली; अमित शहांच्या या दाव्यावर कलावती म्हणतात…

0
440

नवी दिल्ली,दि.१०(पीसीबी) – लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या विदर्भातील कलावती बांदूरकर यांचा उल्लेख केला. कलावती यांच्या घरी राहुल गांधींनी जेवण केलं होतं. मात्र, या कलावतींना राहुल गांधींनी नाहीतर पंतप्रधान मोदींनी मदत केल्याचा दावा अमित शहांनी केला. मदतीच्या चर्चा सुरु असतानाच कलावती यांनी याबाबत स्पष्ट सांगितले.

2008 मध्ये महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये यवतमाळमधील कलावती यांच्या पतीने आत्महत्या केली होती. यानंतर राहुल गांधी यांनी कलावती यांना आधार देण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मदतही केली होती. मात्र, याच मदतीवरून अमित शहा यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. राहुल गांधी हे कलावती यांच्या घरी गेले होते. त्यांनी त्यांच्या घरातील गरिबीचे वर्णन केले. मात्र, गरीब कलावतींना घर, वीज, गॅस, धान्य इत्यादी देण्याचे काम नरेंद्र मोदींनी केल्याचे अमित शहा म्हणाले.

शहा यांच्या या वक्तव्यानंतर कलावती प्रसिद्धी झोतात आल्या. आता कलावती यांनी अमित शहांच्या दाव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. अमित शहांच्या दाव्याबाबत कलावती यांना विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतरच त्यांना मदत मिळाली. काँग्रेसने केलेल्या त्या मदतीशी भाजपचा काहीही संबंध नाही’.

2008 मध्ये संसदेमधील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी कलावती बंदुरकर यांचा उल्लेख केला होता. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा चेहरा म्हणून कलावती या देशभरामध्ये चर्चेत आल्या. राहुल गांधींनी कलावती यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यावेळी सुलभ इंटरनॅशनलने या महिलेला 30 लाखांची मदत केली होती. हे पैसे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मरागाव शाखेमधीली कलावती यांच्या फिक्स डिपॉझिटवर जमा करण्यात आला.