“कलाकार हा ‘श्री’रंगाचा खरा पुजारी!”

0
155

पिंपरी – “कलाकार हा ‘श्री’रंगाचा खरा पुजारी असतो!” असे गौरवोद्गार ज्येष्ठ शिल्पकार सी. आर. होनकळस यांनी क्लब हाऊस, अक्षयनगर, फेज – १, डीपी रोड, विशालनगर, पिंपळे निलख येथे काढले. चित्रकार अजितकुमार जमदाडे यांच्या दोन दिवसीय हस्ताक्षर आणि पेंटिंग्ज प्रदर्शनाचे उद्घाटन करताना शनिवार, दिनांक ०४ मे २०२४ रोजी होनकळस बोलत होते. विनाशुल्क असलेल्या या प्रदर्शनाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला.

सी. आर. होनकळस पुढे म्हणाले की, “सुंदर हस्ताक्षर हे सकारात्मक स्वभावाचे आणि उन्नतीचे प्रतीक असते. रंगांना जाती, धर्मांचे, वर्णांचे बंधन नसते. रंगांना ‘श्री’रंग करण्याचे सामर्थ्य कलाकारात असते. कलाकाराचे हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांप्रमाणेच पवित्र अन् पुण्यवान असतात!”

पिंपरी येथे बालपण व्यतीत करून शिक्षण घेतलेल्या अजितकुमार जमदाडे यांनी छंद म्हणून मराठी सुलेखन, ठिपक्यांची चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, जलरंग चित्रकला, रनिंग मराठी, नॅनो रायटिंग (सूक्ष्म अक्षरलेखन) अशी कला जोपासली. बालगंधर्व कलादालनात पाहिलेले एक चित्रप्रदर्शन त्यांच्या जीवनाला कलाटणी देऊन गेले. त्या प्रसंगापासून त्यांनी चित्रकलेतील विविध प्रकारांचा ध्यास घेतला. दिग्गज चित्रकारांकडून मार्गदर्शन घेतले. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सुमारे आठ लाख ठिपक्यांच्या साहाय्याने आणि पाच महिन्यांच्या कालावधीत रेखाटलेले पहिले ठिपक्यांचे चित्र त्यांना कलाजीवनात हुरूप देणारे ठरले. पुढे त्यांनी आठ वर्षांच्या कालावधीत स्केचपेन आणि जेलपेनचा वापर करून विविध धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक आणि प्रासंगिक चित्रे साकारली. अभिनेते प्रशांत दामले, संजय नार्वेकर, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी त्यांच्या चित्रांचे कौतुक केले. निगडी येथील कलादालनात जमदाडे यांनी आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवले होते.

अजितकुमार जमदाडे यांनी २०१० मध्ये नॅनो रायटिंग (सूक्ष्म अक्षरलेखन) ही कला आत्मसात केली. पाच बाय चार इंचाच्या चौकोनात लिहिलेल्या २१ हजार ‘रामराम’ या सूक्ष्म अक्षरातील शब्दांना वाचायला भिंगाचा वापर करावा लागतो. २०१५ मध्ये त्यांच्या कंपनीत भरवलेल्या सूक्ष्म अक्षरलेखन चित्रांच्या प्रदर्शनाला जर्मनीतील संचालकांनी भेट दिली. ती सूक्ष्म अक्षरातील चित्रे त्यांना बेहद्द आवडल्याने त्यांनी नॅनो रायटिंगमध्ये आपल्या पत्नीचे नाव गुंफून चित्र रेखाटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार जमदाडे यांनी चार बाय चार इंचाच्या चौकोनात सुमारे दीड हजार सूक्ष्म अक्षरांची कलाकृती साकार करून ती जर्मनीला पाठवली.

आपल्या कलाप्रवासात निगडी प्राधिकरणातील चक्रव्यूह मित्रमंडळ आणि विशेषत: सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे यांनी वेळोवेळी प्रेरणा दिल्याचे अजितकुमार जमदाडे यांनी नमूद केले.