“कलम ३७० निष्क्रिय होणे हीच खरी सरदार पटेल यांना श्रद्धांजली!”

0
231

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – “भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० निष्क्रिय होणे हीच खरी सरदार पटेल यांना श्रद्धांजली होय!” असे विचार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनचरित्राचे संशोधक पंकज पाटील यांनी निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार, दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी व्यक्त केले. भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त जळगाव जिल्हा लेवा समाज मंडळ, पिंपरी – चिंचवड आयोजित ‘घटनेतील कलम ३७० आणि सरदार पटेल यांची भूमिका’ या विषयावरील व्याख्यानात पंकज पाटील बोलत होते. नीना खर्चे, गजानन लोखंडे, सचिन वाणी, मधुकर पाचपांडे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

पंकज पाटील पुढे म्हणाले की, “राज्यघटनेत ३७० कलम समाविष्ट केल्यामुळे काश्मिरी नागरिकांच्या मनात विषारी बीजाची पेरणी झाली; आणि हे पीक जोमाने फोफावले. खंबीर राजकीय इच्छाशक्ती दाखवून हे कलम हटविल्याने हा विषवृक्ष आता समूळ उखडून टाकला गेला आहे. वास्तविक डॉ. वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि इतर अनेकांचा या कलमाला विरोध होता. हे कलम निष्क्रिय झाल्याने सरदारांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या अखंडतेला बळ प्राप्त झाले आहे. भारतीयांच्या मनातील भीती दूर झाली. काश्मीरमध्ये पर्यटनाला चालना मिळाली. तिथल्या विकासाची दारं खुली झाली आहेत. सरदार पटेल यांना हेच अपेक्षित होते; पण दुर्दैवाने सरदारांचे विचार कृतीत येण्यासाठी ७०-७५ वर्षे प्रतीक्षा करावी लागली!”

याप्रसंगी डॉ. लीलाधर पाटील यांनी आपल्या मनोगतातून सरदार पटेल यांच्या जाज्वल्य देशाभिमानावर कविता सादर केली. भागवत झोपे यांनी प्रास्ताविक केले. मंडळाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद चौधरी आणि माजी नगरसेवक नामदेव ढाके यांनी संयोजन केले. अशोक भंगाळे यांनी सूत्रसंचालन केले. ऊर्मिला पाटील यांनी आभार मानले. दीपाली नारखेडे, राकेश वायकोळे, महेश पाटील, अनंत चौधरी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.