कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का, काँग्रेसच्या जागा वाढणार

0
187

बेंगळुरू, दि. २७ (पीसीबी) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये सरळ टक्कर असणार आहे. टीव्ही 9 आणि सी व्होटर यांनी एकत्रित केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपच्या चिंता वाढताना दिसत आहेत. कारण कर्नाटकात जनतेचा कौल बदलताना दिसत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का बसत असून काँग्रेसच्या जागा वाढताना दिसत आहेत. कर्नाटकात कोणाचं सरकार बनतंय, भाजप-काँग्रेसच्या दाव्यांमध्ये किती ताकद आहे. पाहुया लोकांचा मूड काय आहे.

कर्नाटकात 10 मे रोजी मतदान
कर्नाटकमध्ये 10 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. प्रत्येक पक्ष सत्तेसाठी आपापल्या परीने दावा करत आहे. भाजपचा दावा आहे की ते पुन्हा सरकार स्थापन करणार, तर काँग्रेसने 150 पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा केला आहे. पण मतदारांच्या मनात काय आहे हे टीव्ही 9 ने सर्व्हेच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे.

जुन्या म्हैसूरमधील 55 जागांपैकी भाजपला 4 ते 8, तर काँग्रेसला 21 ते 25 जागा मिळू शकतात. कित्तूर कर्नाटकातील 50 जागांपैकी भाजपला 21 ते 25 आणि काँग्रेसला 25 ते 29 जागा मिळू शकतात. जेडीएसला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. तटीय कर्नाटकमधील 21 जागांपैकी भाजपला 16 ते 20 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 1 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. कलाना कर्नाटकातील 31 जागांपैकी भाजपला 11 ते 15 जागा, काँग्रेसला 16 ते 20 जागा मिळू शकतात. जेडीएसला 1 जागा मिळू शकते. मध्य कर्नाटकातील 35 जागांपैकी भाजपला 13 ते 17, काँग्रेसला 18 ते 22 आणि जेडीएसला 1 जागा मिळू शकते. बंगळुरूमधील 32 जागांपैकी भाजपला 7 ते 11, काँग्रेसला 18 ते 22 आणि जेडीएसला 1 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार भाजपला 79 ते 89 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 106 ते 116 जागा मिळू शकतात. तर जेडीएसला 24 ते 34 जागा मिळण्याची शक्यता आहे.

कर्नाटकात कोणाला किती जागा ?
बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला 224 पैकी 113 जागांची आवश्यकता असेल. या सर्वेक्षणानुसार काँग्रेस खूपच मजबूत स्थितीत दिसत आहे, असे म्हणता येईल. ते बहुमताच्या जवळ येऊ शकतात. पण काँग्रेस १५० जागांवर जावा करत आहे. मतदानपूर्व सर्वेक्षणानुसार, काँग्रेसला 40% मते मिळतील, तर भाजपला 33.9% मते मिळतील. जेडीएसला 18.8 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

2018 मध्ये काँग्रेसची मते 38 टक्के होती, ती यावेळी वाढू शकतात. दुसरीकडे, भाजपची मतांची टक्केवारी 36 टक्क्यांवरून 33.9 टक्क्यांवर येऊ शकते. 2018 मध्ये भाजपला सर्वाधिक 104 जागा मिळाल्या होत्या.

सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आले की, विधानसभा निवडणुकीत तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करू इच्छिता? दुहेरी इंजिन सरकार राज्यासाठी फायदेशीर ठरले आहे का, हेही जनतेतून जाणून घेण्यात आले. याच्या उत्तरात 38.7% लोकांनी होय असे उत्तर दिले, तर 40.6% लोकांनी नाही असे उत्तर दिले. 20.7% म्हणाले की ते काहीही सांगता येणार नाही असे म्हटले.

भाजपने ज्या पद्धतीने सरकार चालवले आहे ते कसे पाहता? सर्वेक्षणात विचारण्यात आले की, काँग्रेसने अनेक मोफत योजना जाहीर केल्या आहेत, त्यामुळे त्यांची मते वाढण्याची शक्यता आहे का? 41.4% लोकांनी होय उत्तर दिले, तर 38.1% ने नाही असे उत्तर दिले.